मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी
By Admin | Updated: December 7, 2015 06:35 IST2015-12-07T06:35:40+5:302015-12-07T06:35:40+5:30
शहरात मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून या टोळीचा सदस्य अलेला एक १० वर्षीय मुलगा

मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी
नागपूर : शहरात मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून या टोळीचा सदस्य अलेला एक १० वर्षीय मुलगा पाचपावली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याजवळून ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. तो सापडल्याचा सुगावा लागताच टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघे फरार झाले.
शनिवारी सकाळी गस्त घालताना पोलिसांना एक मुलगा मोतीबाग रेल्वे क्वॉर्टर बाजारात संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ आठ मोबाईल सापडले. त्याने ते मोबाईल बाजारातून चोरल्याचे कबूल केले. त्याचे इतर साथीदार बाजरातच फिरत होते. पोलिसांनी मुलाला पकडल्याचे लक्षात येताच ते फरार झाले.
पोलिसांच्या हाती सापडलेला अल्पवयीन मुलगा व त्याचे टोळीतील इतर साथीदार हे झारखंडचे रहिवासी आहेत. ही टोळी लहान मुलांच्या माध्यमातून चालविली जाते. अल्पवयीन मुलगा ‘मोबाईल लिफ्टर’ असतो. ही टोळी साप्ताहिक बाजारात फिरून मोबाईल चोरतात. खाली वाकून भाजी किंवा इतर साहित्य खरेदी करताना व्यस्त असलेल्या व्यक्तीच्या बाजूला ही मुले उभी राहतात आणि मोबाईल चोरतात. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येतपर्यंत तो दूरवर निघून गेलेला असतो. या टोळीतील सदस्य मोबाईल चोरणाऱ्या मुलाच्या आजूबाजूलाच उभे असतात. धोका लक्षात येताच ते सामान्य नागरिकांसारखे समोर येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. सापडल्यावर मुलगा रडून क्षमा मागत असल्याने ही टोळी हाती लागत नाही. सापडलेल्या अल्पवयीन मुलाने एका महिन्यापूर्वीच या टोळीत सहभागी झाल्याचे सांगितले. त्याने सांगितल्यानुसार शाळेत जाण्यासाठी आईने रागावल्यामुळे तो संतापून या टोळीसोबत नागपूरला निघून आला. या टोळीतील सदस्यही त्याच्या गावातीलच राहणारे आहेत.
या टोळीने महिनाभरापूर्वी यशोधरानगर येथील कांजी हाऊस चौकात आपले बस्तान मांडले आहे. ते हॉटेल किंवा फुटपाथवर रात्र घालवितात. येथे त्यांचा धंदा चालत असल्याने ते भाड्याने घर घेण्याच्या तयारीत होते. परंतु अल्पवयीन मुलगा सापडल्याने ते फरार झाले. मुलगा दिशाभूल करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई ठाणेदार राजेंद्र निकम, पीएआय मनीष गावंडे, एएसआय उल्हास पवार, हवालदार अनिल ठाकूर, नायक शिपाई राजेश देशमुख, रोशन तिवारी, प्रदीप पवार आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)