मोबाईल चोर सीसीटीव्हीत अडकला
By Admin | Updated: August 11, 2016 02:14 IST2016-08-11T02:14:12+5:302016-08-11T02:14:12+5:30
आपल्या घरात झोपलेल्या एका तरुण डॉक्टरचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. गुरुदेवनगर नंदनवन येथे सकाळी सात-सव्वासात वाजता...

मोबाईल चोर सीसीटीव्हीत अडकला
गुरुदेवनगर नंदनवन येथील घटना : घरात झोपलेल्या डॉक्टरचा मोबाईल नेला चोरून
नागपूर : आपल्या घरात झोपलेल्या एका तरुण डॉक्टरचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. गुरुदेवनगर नंदनवन येथे सकाळी सात-सव्वासात वाजता घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सुमित पैडलवार (२३) असे या तरुण डॉक्टरचे नाव. तो प्लॉट नंबर २६२ गुरुदेवनगर नंदनवन येथे राहतो. घरी वडील गुलाबराव, आई सारिका, मोठा भाऊ वैभव, व कुणाल आणि आजी विठाबाई लिंगतवार राहतात. आई वडील दोघेही कामठीला नोकरी करतात. ते सकाळीच कामाला निघून जातात. दोन्ही भाऊ इंजिनियरिंग करीत आहेत. घरी आजी एकटीच असते. ९ आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सुमितचे आईवडील सकाळीच कामाला निघून गेले. दोन्ही भाऊ आपापल्या खोलीत अभ्यास करीत होते. सुमित हा हॉलमध्ये झोपला होता. सकाळी ७.१७ वाजताच्या सुमारास एक २२ ते २३ वर्षाचा तरुण एका पायाने लंगडत चालत सुमितच्या घरासमोर असलेल्या घरी गेला. तेथून लगेच परत आला. त्यानंतर तो सुमितचा घरचा उघड्या गेटमधून आत आला. दरवाजावर काही वेळ तो उभा राहिला. दरम्यान खिशातून त्याने एक कागद बाहेर काढला व तो कुणाशी बोलत असल्याचे भासवू लागला. दरम्यान तो घरात डोकावून पाहू लागला. घरात कुणी नसल्याचे त्याला दिसले. सुमित हॉलमध्ये झोपला होता. तो तरुण आत आला आणि सुमितजवळ असलेला मोबाईल उचलला आणि आपल्या पॅण्टच्या मागच्या खिशात टाकून बाहेर पडला. यावेळी घरात सुमितची आजी व दोन्ही भाऊ होते, पण ते आतल्या खोलीत होते. उठल्यावर मोबाईल दिसत नसल्याने सुमितने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)
नंदनवन पोलिसांनी केली हरवल्याची नोंद
गुरुदेवनगर सोसायटीमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने चोऱ्या होत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पैडलवार कुटुंबीयांनी सहा महिन्यांपूर्वीच घरी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यामध्ये एक मुलगा मोबाईल चोरून नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनाही ते फुटेज दाखवण्यात आले, असे असतानाही नंदनवन पोलिसांनी मात्र केवळ मोबाईल हरवल्याची नोंद केली. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला आहे.