मोबाईल व्यापाऱ्याचा सुपारी खून?
By Admin | Updated: March 11, 2015 02:09 IST2015-03-11T02:09:06+5:302015-03-11T02:09:06+5:30
मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या खुनातील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे.

मोबाईल व्यापाऱ्याचा सुपारी खून?
नागपूर : मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या खुनातील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे. या हत्येसाठी एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या साथीदारांना सुपारी दिली होती, अशी खळबळजनक माहिती आहे. या माहितीच्या आधारावर सीताबर्डी पोलीस आरोपींच्या मागावर असून, लवकरच ते जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भरत खटवानी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी परिसरातील कुख्यात गुंड शरीफ याने हल्ला केला होता. त्यावेळी शिक्षेच्या भीतीने शरीफने समझोता करण्यासाठी व्यापाऱ्यांवर दबाव टाकला होता. त्यामुळे खटवानी यांनी आपली तक्रार मागे घेतली होती. यानंतर काही दिवसांतच शरीफ हा परत सक्रिय होऊन इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये गुंडगिरी करू लागला होता. खटवानीवर तो हप्त्यासाठी दबाव टाकत होता. परंतु खटवानी यांनी त्याला हप्ता देणे नाकारले होते. त्यामुळे शरीफनेच खटवानीच्या हत्येची सुपारी दिली असावी, असा कयास आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरीफ खटवानी यांना त्रास देत होता. दुकानासमोर त्याने जुगार व अंमली पदार्थाचा अड्डा सुरू केला होता. त्याच्या विरोधात खटवानी व्यापाऱ्यांना एकजूट करीत होते. हे शरीफच्या लक्षात आले. त्याने आठवडाभरापूर्वी खटवानीच्या हत्येची सुपारी दिली. गुजरवाडीच्या गुंडाकडे हे काम सोपविले आणि शरीफ काही सहकाऱ्यांसोबत धार्मिक यात्रेवर रवाना झाला. त्यानंतर सुपारी किलर्सने खटवानीवर हल्ला केल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेतील हल्लेखोरांच्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना लागला आहे. एक आरोपी शिक्षण घेत आहे, दुसरा हमाली करतो तर तिसरा दुकानात काम करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. यासंदर्भात माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहे. (प्रतिनिधी)