अवास्तव वीज बिलाविरुद्ध मनसेचा एल्गार
By Admin | Updated: August 7, 2014 01:03 IST2014-08-07T01:03:11+5:302014-08-07T01:03:11+5:30
वीज वितरण फ्रे न्चायजी कंपनी ‘एसएनडीएल’तर्फे नागरिकांना अवास्तव वीज बिल पाठविले जात आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्यांनासुद्धा आठ ते दहा हजार रुपयांपर्यंतचे बील पाठविण्यात आले आहे.

अवास्तव वीज बिलाविरुद्ध मनसेचा एल्गार
एसएनडीएल कार्यालयावर मोर्चा : प्रशांत पवार यांचे नेतृत्व
नागपूर : वीज वितरण फ्रे न्चायजी कंपनी ‘एसएनडीएल’तर्फे नागरिकांना अवास्तव वीज बिल पाठविले जात आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्यांनासुद्धा आठ ते दहा हजार रुपयांपर्यंतचे बील पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एल्गार पुकारला. बुधवारी एसएनडीएल कार्यालयावर धडक देऊन पाठविण्यात आलेली अवास्तव वीज बिले फाडून निषेध व्यक्त केला.
मनसेचे उपशहर प्रमुख प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात बुधवारी संविधान चौकातून आकाशवाणी रोडवरील एसएनडीएल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. एसएनडीएल विरोधात घोषणा देत सक्तीची मीटर बदली रद्द करा, नवीन कनेक्शन त्वरित द्या आणि अवास्तव पाठविलेले बील रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चादरम्यान झालेल्या सभेत प्रशांत पवार म्हणाले, एसएनडीएलतर्फे नागपूरच्या जनतेला लुटले जात आहे. मीटर बदलवण्यामागचे कारण काय? एसएनडीएलच्या माध्यमातून वसुली मोहीम सुरू आहे. स्पॅन्कोच्या मीटरमध्ये गडबड आहे, जुने एमएसईबीचे मीटर लावण्यात यावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष प्रवीण बरडे, अविनाश जाधव यांनीही मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
आंदोलनात सहभागी नागरिक वीज बिल घेऊन आले होते. एसएनडीएलचे व्यवसायप्रमुख सोनल खुराना हे मोर्चाला सामोरे गेले. पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचण्यात आला. या वेळी मोर्चेकऱ्यांनी वीज बिल फाडून रोष व्यक्त केला. मोर्चात जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर, शहर सचिव सुधीर अघाव, चंदू लाडे, रितेश मेश्राम, अजय ढोके, विश्वनाथ देशमुख, मिलिंद महादेवकर, सुश्रृत खेर, महेश जोशी, मनोज अग्नीहोत्री, रवी वऱ्हाडे, समीर खान, प्रमोद वैद्य, सुभाष कोंडलवार, संतोष गायकवाड आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)