मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा
By Admin | Updated: May 4, 2016 04:00 IST2016-05-04T04:00:58+5:302016-05-04T04:00:58+5:30
महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी

मनसे कार्यकर्त्यांनी जाळला विदर्भाचा झेंडा
नागपूर : महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला. विदर्भवाद्यांनी अखंड महाराष्ट्राचा झेंडा जाळून राज्याच्या अस्मितेचा अपमान केला, त्यामुळे हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. १ मे रोजी राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भाचा झेंडा फडकवला होता, हे विशेष.
नागपुरातील धरपमेठ परिसरात सायंकाळी मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर उपप्रमुख प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. विदर्भवाद्यांच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा जाळला.
महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही व त्याचे तुकडेदेखील होऊ देणार नाही, या आशयाची निदर्शने केली. आंदोलन आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कुठलीही अनुचित घटना न करता मनसे नागपूरतर्फे महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. पण विदर्भवाद्यांनी अखंड महाराष्ट्राचा संदेश लिहिलेला मनसेचा झेंडा जाळल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष अजय ढोके, महेश जोशी, प्रशांत निकम, उमेश बोरकर, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, मनीषा पापडकर, सुश्रुत खेर, मंगेश डुके, आशिष वार्डेकर, हर्षद दसरे, ऋषिकेश जाधव, मिलिंद माने, युवराज नागपुरे, शशांक गिरडे, समीर अरबट यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)