प्रथमच निर्वाचित १३० सदस्यांसाठी ‘आमदार निवास’ आकर्षण
By Admin | Updated: November 21, 2014 00:49 IST2014-11-21T00:49:43+5:302014-11-21T00:49:43+5:30
राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील.

प्रथमच निर्वाचित १३० सदस्यांसाठी ‘आमदार निवास’ आकर्षण
नागपूर : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत १३० आमदार प्रथमच विधानसभेवर निर्वाचित झाले असून ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमधील आमदार निवासात प्रथमच ‘आमदार’ म्हणून थांबतील.
दरवर्षी नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत राज्यातील सत्तांतरानंतर होणारे हिवाळी अधिवेशन सर्वार्थाने वेगळे आहे. जुन्या आणि नवीन सदस्यांचा अनोखा मेळ या अधिवेशनाच्या निमित्ताने पाहायला मिळेल. १३० नवीन सदस्यांसह १५ वर्षांपासून आमदार म्हणून अधिवेशनात हजेरी राहणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री म्हणून नवीनच आहेत. अध्यक्ष, मंत्री यांच्यासह विरोधी पक्ष नेतेही या अधिवेशनात नवीनच असणार आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत विशेष अधिवेशन झाले. पण त्यात इतर कामकाज झाले नव्हते. त्यामुळे खरे अधिवेशन हेच ठरणार आहे. नवीन निर्वाचित झालेल्या सदस्यांना विधिमंडळाच्या कामकाजासोबतच आमदार निवास, विधानभवन आणि परिसराबाबतही उत्सुकता आहे.
अधिवेशनासाठी आलेल्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवासात केली जाते. यावेळी १३० नवे चेहरे आमदार म्हणून तेथे असतील. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर १२ पैकी पाच आमदार प्रथमच निर्वाचित झाले आहेत. त्यात सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर), समीर मेघे (हिंगणा),डी.एम. रेड्डी (रामटेक) आणि आशिष देशमुख (काटोल) यांचा समावेश आहे.
प्रत्येक आमदारांसाठी आमदार निवासात सर्व सुविधा युक्त स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली जाते. अनेक जण आमदार निवासात न थांबता इतरत्र थांबतात. मात्र त्यांच्या खोलीत कार्यकर्ते व त्यांचा कर्मचारी वर्ग मुक्कामाला असतो.
दरम्यान ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी आमदार निवास सज्ज ठेवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षा व्यवस्थेपासून तर विद्युत, पाणीपुरवठा, स्वच्छता यावर भर दिला जात आहे. देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असून रंगरंगोटीही केली जात आहे. सध्या अधिवेशन सुुरू होण्यास दोन आठवड्याचा अवधी आहे. शिल्लक काम या काळात पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)