निवडणूक याचिका अवैध असल्याचा आमदार रवी राणा यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 19:40 IST2021-10-12T19:39:56+5:302021-10-12T19:40:57+5:30
Nagpur News अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित मतदार सुनील खराटे यांची निवडणूक याचिका अवैध असल्याचा दावा केला आहे.

निवडणूक याचिका अवैध असल्याचा आमदार रवी राणा यांचा दावा
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित मतदार सुनील खराटे यांची निवडणूक याचिका अवैध असल्याचा दावा केला आहे. राणा यांनी यासंदर्भात दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल केला आहे, तसेच ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्याची विनंती केली आहे. (MLA Ravi Rana claims that the election petition is invalid)
राणा यांच्याविरुद्ध खराटे यांच्यासह मतदार आशिष धर्माळे यांनीदेखील निवडणूक याचिका दाखल केली आहे. धर्माळे यांची याचिका खारीज करण्यासाठीही राणा यांच्या वतीने समान अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणा यांनी लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदी व भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करून विजय मिळवला. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
आयोगाच्या अर्जावर उत्तर मागितले
या दाेन्ही निवडणूक याचिकांतील प्रतिवादींमधून नाव वगळण्याकरिता भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. न्यायालयाने मंगळवारी राणा व याचिकाकर्त्यांना या अर्जांवर २४ नाेव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकांवर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.