आगामी निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घ्याव्यात : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 18:52 IST2022-02-08T18:18:05+5:302022-02-08T18:52:33+5:30
राज्य सरकारने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू ठामपणे मांडावी, असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आगामी निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घ्याव्यात : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : न्यायप्रविष्ठ असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आयोगाने निवडणूका घेऊ नये अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आ. बावनकुळे यांनी पत्रकरांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची बाजू ठामपणे मांडावी, असे बावनकुळे म्हणाले. लवकरच हे प्रकरण अंतिम होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर, निवडणूक आयोगाने आगामी निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्यणानुसार घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.
गेली काही वर्ष आम्ही ओबीसी आरक्षणासाठी झगडतोय. पण ओबीसी समाजाला न्याय मिळेल तो आमच्या संघर्षाच्या विजयाचा दिवस असेल. ओबीसी समाजाने सोसलेल्या हालअपेष्टा पुढे सोसाव्या लागणार नाही हा विश्वास वाटतो, असेही बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.