नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’च्या (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड)वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठाने देयके थकविल्याचा आरोप करीत ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाच्या सेवा बंद केल्या आहेत. ‘एमकेसीएल’ला विद्यापीठाने संकेतस्थळ विकसित करणे व विद्यार्थ्यांना ‘लॉगीन आयडी’ प्रदान करणे यासह अन्य सर्व कामे दिली होती. सुरुवातीला सर्व काही योग्य राहिल्यानंतर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’मध्ये खटके उडायला लागले. ‘एमकेसीएल’ने कामांची पूर्तता केली नसल्याचा आरोप विद्यापीठाकडून करण्यात आला अन् सुमारे ३ कोटी ६४ लाखांची देयके थकवून ठेवली. ‘एमकेसीएल’ने वाढीव बिले दिल्याचादेखील दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. ‘एमकेसीएल’ने थकबाकीसाठी जवळपास २५० वेळा विद्यापीठाला पत्र लिहिले. ‘एमकेसीएल’च्या कामाची चौकशी करण्यासाठी माजी प्र-कुलगुरू डॉ.महेशकुमार येन्की यांची समिती नेमण्यात आली होती. यादरम्यान, ऐन हिवाळी परीक्षांच्या कालावधीत ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाचे काम बंद केले. त्यामुळे बैठक क्रमांक, परीक्षेचे प्रवेशपत्र यासाठी विद्यापीठाला धावपळ करावी लागली होती. मागील महिन्यात ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व थकबाकी देण्याची विनंती केली होती. याला मान्यता देण्यात आली नसल्याने अखेर ‘एमकेसीएल’ने काम थांबविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)परीक्षा विभागावर ताणदरम्यान, परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी यासंदर्भात एक अधिसूचनादेखील काढली आहे. या शैक्षणिक सत्रापासून ‘एमकेसीएल’ने नामांकन व परीक्षा आवेदनपत्राची प्रक्रिया बंद केल्याचे या अधिसूचनेद्वारे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. महाविद्यालयांकडून नामांकन व परीक्षा आवेदनपत्राशी संबंधित कागदपत्रे ‘हार्ड’ व ‘सॉफ्टकॉपी’च्या स्वरूपात मागविण्यात आले आहेत. यामुळे परीक्षा विभागावरील ताण वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या एका खासगी कंपनीला हे काम सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एमकेसीएल’ने केली सेवा बंद
By admin | Updated: July 21, 2014 00:56 IST