मनपाचे मिशन अतिक्रमण
By Admin | Updated: May 20, 2015 02:45 IST2015-05-20T02:45:26+5:302015-05-20T02:45:26+5:30
सीताबर्डीतील काही व्यापाऱ्यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व राजकीय नेत्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा पथकावर कोणताही परिणाम झाला नाही.

मनपाचे मिशन अतिक्रमण
अतिक्रमणावर लाठी : राजकीय हस्तक्षेपही फेल
नागपूर : सीताबर्डीतील काही व्यापाऱ्यांनी कारवाई थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक व राजकीय नेत्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा पथकावर कोणताही परिणाम झाला नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याने प्रशासनाने अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतल्याची माहिती अधिकारी व्यापाऱ्यांना देत होते. परंतु यामुळे व्यापाऱ्यांचे समाधान झाले नाही. पथकाने कशाचीही पर्वा न करता पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू ठेवली. व्हेरायटी चौक ते महाराजबाग रोड, सीताबर्डी मुख्य मार्गाने लोखंडी पुलापर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.
जेसीबीच्या साहाय्याने दुकानासमोरील अतिक्रमण करून उभारलेले शेड, होर्डिग्ज व बोर्ड हटविले जात होते. दुपारी १२.३० पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ६.३० पर्यत राबविण्यात आली. परंतु दिवसभर व्यापाऱ्यांचा विरोध सुरू होता. त्यामुळे विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस सौम्य लाठीमार करीत होते. कारवाईला विरोध करणाऱ्या ८ -१० व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. व्यापारी व पोलिसांचा लपंडाव दिवसभर सुरू होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या कारवाईवर अनेक व्यापारी नाराजी व्यक्त करीत होते. परंतु याचा कारवाईवर कोणताही परिणाम झाला नाही. (प्रतिनिधी)
कारवाईच्या नावाखाली अतिरेक : व्यापाऱ्यांचा आरोप
बांधकाम वैध असतानाही पथकाकडून तोडण्यात आल्याचा आरोप काही दुकानदारांनी केला. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या पापे ज्यूस सेंटरचे मालक विनित अरोरा व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा मांडली. गेल्या ४० वर्षापूर्वीचे बांधकाम आहे. आयआरडीपी अंतर्गत शहरातील रस्त्यांची कामे करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी अतिक्रमण नसल्याने बांधकाम तोडले नव्हते. आमच्याकडे दुकानाची कायदेशीर कागपत्रे आहेत. त्यानंतरही बांधकाम तोडण्यात आले. दुकानातील सामान व फ्रीजची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केली. विनित अरोरा यांना पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले होते.
१९४७ पूर्वीचे दुकान तोडले
४सीताबडीं भागातील मोदी न. ३ येथे दत्तात्रय इंगळे यांचे १९४७ पूर्वीचे फुलांचे दुकान आहे. अतिक्रमण पथकाने मंगळवारी तोडले. या संदर्भात मनपाकडून नोटीस वा पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. दुकान मालकीच्या जागेवर आहे. अतिक्रमण नाही. धंतोली झोनला ४ मे २०१५ रोजी दुकानाची कागदपत्रे सादर केली आहे. मनपाचा दरवर्षी कर भरतो. त्यानंतरही दुकान पाडल्याची व्यथा दत्तात्रय इंगळे यांनी मांडली.
१३ धार्मिक स्थळे हटविली
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यावरील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाती घेतली आहे. मंगळवारी नेहरूनगर झोन अंतर्गत येणारी १३ धार्मिक स्थळे हटविण्यात आली. यात सक्करदरा पोलीस स्टेशन जवळील नागोबा मंदिर, भांडेप्लॉट येथील नागोबा मंदिर, उमरेड रोड ते आयुर्वेदिक कॉलेज मार्गावरील ताजुद्दीन बाबा यांचे तैलचित्र व टीनाचे शेड, ओमनगर येथील नागोबा मंदिर, ओमनगर येथील पाचफणी मंदिर, नेहरुनगर हिमालय बार जवळील गणेश मंदिर, अक्षय भवन येथील हनुमान मंदिर, सुदामपुरी येथील नागोबा मंदिर, नेहरूनगर गार्डनजवळील गणेश मंदिर, हिमालय बार जवळील शिवनाग मंदिर, नेहरुनगर हनुमान मंदिर, ओमनगर येथील हनुमान मंदिर आदींचा यात समावेश आहे. झोनचे सहाय्यक आयुक्त महेश मोराणे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई केली.
१२५ दुकानांवर कारवाई
व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मुख्य बाजाराकडून लोखडी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात आले. व्हेरायटी चौकातील पापे ज्युस कॉर्नर, महराष्ट्र एम्पोरियम, यौकर शुज, बॉम्बेवाला रेडिमेड गारमेन्ट, खानदान ड्रेसेस, पारेख ज्वेलर्स, खादीम शुज, नागपूर हातमाग सोसायटी, दास ज्वेलर्स, दिनशा आईस्क्रीम, सिटी फॅशन, कुनाल साडीवाला, आदी दुकानासमोरील ओटे , नामफलक हटविण्यात आले. तसेच व्हेरायटी चौक ते महाराज बाग चौकादरम्यानच्या मार्गावरील कावेरी बार, मोतीमहल भोजनालय, नीलम स्टुडिओ, गणेश रेस्टारंन्ट, जयभोले भोजनालय, टीटोज रेस्टरंन्ट आदींचे शेड व ओटे हटविण्यात आले.
आयुक्तांची भेट
मनपा आयुक्त श्रावण हडीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रमोद भुसारी, धंतोली झोनचे सहायक आयुक्त सुभाचन्द्र जयदेव, अतिक्रमण अधीक्षक अरुण पिपुरडे, उप अभियंता अनिल कडू, पोलीस निरीक्षक वेरणेकर, मनपाचे ५० कर्मचारी व अधिकारी, पोलिसांचा ताफा तीन पोलीस व्हॅन, जेसीबी, ट्रक, विद्युत गाडी असा फौजफाटा होता.