डीएमईआरचे मिशन एम्स
By Admin | Updated: October 11, 2014 02:49 IST2014-10-11T02:49:07+5:302014-10-11T02:49:07+5:30
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) प्रस्तावित जागेची पाहणी केली.

डीएमईआरचे मिशन एम्स
नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) प्रस्तावित जागेची पाहणी केली. यातील अडथळे व उपाययोजनांवर चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान त्यांनी मेयो रुग्णालयातील एमबीबीएसच्या वाढलेल्या १५० जागांच्या संदर्भात मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) काढलेल्या त्रुटींचा आढावा घेतला.
मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या सुमारे ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभागाची मिळून सुमारे १३० एकर जागेवर जिथे सागवनाची झाडे व मोकळा परिसर आहे तिथे कॉलेज तर अजनी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मेडिकल वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचे प्रस्तावित आहे. डॉ. शिनगारे यांनी या सर्व जागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, इंदिरा गांधाी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. सुधीर गुप्ता व डॉ. आर.पी. सिंग उपस्थित होते.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या या प्रस्तावित जागेवर अंतिम निर्णय झाल्यास मेडिकलचे विविध विभाग कुठे स्थानांतरित करता येईल या विषयी चर्चा केली. सोबतच याला येणारा अपेक्षित खर्चाचा अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तीन वेगवेगळ्या जागेत ‘एम्स’ उभारले जात असल्याने एकाच ठिकाणी उंच इमारतीचे निर्माण होऊ शकते का, किंवा कारागृह दुसरीकडे स्थानांतरित करून ती जागा मिळू शकते का, यावरही विचार झाल्याचे समजते.
डॉ. शिनगारे यांच्या या दौऱ्यानंतर त्यांनी मेयोत आढावा बैठक घेतली. यात एमबीबीएसच्या वाढलेल्या नुकत्याच ५० जागा मिळून १५० जागांवर एमसीआयाने काढलेल्या त्रुटी, होत असलेले बांधकाम आणि न्यायालयाने दिलेला ‘टाइमबॉण्ड प्रोग्राम’ची माहिती घेतली. ‘लोकमत’प्रतिनिधीने डॉ. शिनगारे यांना या दौऱ्याची माहिती विचारली असता त्यांनी या दौऱ्यात ‘एम्स’वर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. यामुळे डॉ. शिनगारे ‘एम्स’ला घेऊन लपवाछपवी का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)