‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

By Admin | Updated: November 18, 2014 00:51 IST2014-11-18T00:51:27+5:302014-11-18T00:51:27+5:30

गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग

'Mission Clean Ganges' will be successful | ‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

सतीश वटे : पर्यावरणाचा अपमान न करण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला
नागपूर : गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. या मोहिमेसाठी ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यात तयार करण्याचे आव्हान आमच्या संशोधकांपुढे असून, कुठल्याही परिस्थितीत ‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच, असा विश्वास ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला.
स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ह्यआपली वसुंधराह्ण या पर्यावरण प्रदर्शनादरम्यान त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नीरी’शी संबंधित निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकला
पवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबविण्याचे सर्वात कठीण आव्हान आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘नीरी’चे वैज्ञानिक अगदी गोमुखापासून ते हुगलीपर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींवर अभ्यास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त ‘नीरी’च्या देशभरात सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला.
‘नीरी’च्या संशोधन प्रकल्पांत विद्याशाखेचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. निरनिराळ्या विद्याशाखा अन् संशोधन हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान डॉ. वटे यांनी सांगितले. ‘नीरी’ सदैव नागपूरसाठी कार्यरत राहील, असे ते म्हणाले.
शुभांगी रायलू यांनी डॉ.वटे यांची मुलाखत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नागपूर तूर्तास सुरक्षित, पण...
नागपुरात प्रदूषणाची स्थिती काय आहे, यासंदर्भात डॉ.वटे यांना विचारणा केली असता त्यांनी सखोल उत्तर दिले. आजच्या तारखेत नागपुरात वायू तसेच जलप्रदूषणाची पातळी इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर, नागरिकांनी पुढाकार घेऊन घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर पर्यावरणाचा अपमान केला तर निसर्गदेखील तुम्हाला सोडणार नाही, या शब्दांत त्यांनी भविष्यातील धोक्यांची कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

Web Title: 'Mission Clean Ganges' will be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.