मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर !

By Admin | Updated: November 16, 2016 02:40 IST2016-11-16T02:40:24+5:302016-11-16T02:40:24+5:30

छत्रपती चौकातील उड्डाण पुलाचे तोडकाम मोठ्या अद्ययावत क्रशर मशीनने मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाले.

Mission 'Chhatrapati' on the battlefield! | मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर !

मिशन ‘छत्रपती’ युद्धपातळीवर !

अत्यंत सुरक्षेत पूल तोडण्याचे काम : वाहतूक बंद
नागपूर : छत्रपती चौकातील उड्डाण पुलाचे तोडकाम मोठ्या अद्ययावत क्रशर मशीनने मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत चौकातील चार पिलरवर उभ्या पुलाचा ६० टक्के भाग तोडण्यात आला. तत्पूर्वी सोमवारी रात्री पुलावरील लोखंडी ग्रील तोडण्यात आले. पूल तोडण्याचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.
एकूण ४०० मीटर लांब या उड्डाण पुलावर मध्य भागातील चार पिलरवर १३० मीटर बांधकाम आहे. पुलाला पाच टप्प्यात तोडण्यात येणार आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरू करण्यात आले आहे. मोठ्या क्रशर मशीन्सने पुलाची स्लॅब आणि लोखंड तोडण्यात आले. तोडकाम करताना रस्ता पांढऱ्या धुळीने माखला होता. धूळ इतरत्र पसरू नये म्हणून त्यावर मोठ्या स्प्रेने पाणी टाकण्यात येत होते.

परिसरात संचारबंदी
वाहतूक बंद करून छत्रपती पूल तोडण्याचे काम सुरू होताच परिसरात अघोषित संचारबंदी होती. चौकातून जाणारा मार्ग निर्मनुष्य होता आणि दुकाने बंद होती. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर शांतता पसरली होती. केवळ मशीन्स आणि तोडण्याचा आवाज येत होता.
हेल्मेट व मास्क लावण्यावर भर
पूल तोडताना मेट्रो रेल्वे व मत्ते असोसिएट्सचे अभियंते काही कामगारांना हेल्मेट आणि मास्क लावण्याचा सल्ला देत होते. धुळीपासून बचाव करणारे मास्क उत्तम गुणवत्तेचे आहेत. धूळ रस्त्यावर ठेवण्यास मदतनीस ठरणारी मशीन काही वेळ बंद ठेवण्यात आली होती.
स्ट्रक्चरल डिझायनर उपस्थित
पूल तोडताना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी स्ट्रक्चरल डिझायनर सज्ज होते. शिवाजीनगर येथील रहिवासी डिझायनर पी. पाटणकर हे पत्नी आणि मुलीसोबत उपस्थित होते.
लोखंड वेचणाऱ्या महिलांची गर्दी
पूल तोडताना लोखंड गोळा करणाऱ्या महिलांनी मुलांसोबत गर्दी केली होती. लोखंड गोळा करताना त्या मशीन्सकडे गेल्या असता त्यांना सुरक्षा रक्षकांनी बाजूला केले.

पक्ष्यांनी घरटे सोडले
गेल्या १८ वर्षांपासून पुलाखाली विजेच्या खांबावर काही पक्ष्यांनी घरटे बांधले होते. पूल तोडण्याचे काम सुरू होताच मशीन्सच्या कंपनाने पक्ष्यांचे घरटे तुटले. दुपारी ३ च्या सुमारास एक कबूतर पुलाखालील विजेच्या खांबावर घरटे शोधत होता. काही वेळानंतर तो परत गेला. नागपुरात होणाऱ्या विकास कामात या पक्ष्याचे योगदान असल्याचे दिसून आले.

दररोज २० तास तोडकाम
उड्डाण पूल ३० नोव्हेंबरपर्यंत जमीनदोस्त होणार आहे. दररोज २० तास काम करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश अग्रवालआणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र रामटेककर यांच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम सुरू आहे. निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीच पूल तोडण्याचा प्रयत्न असल्याचे ‘एनएमआरसीएल’चे सहायक अभियंते जयप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

पुलाचे तोडकाम मोबाईलमध्ये कैद
उड्डाण पुलाचे तोडकाम अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. चौकातील एका इमारतीवर चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी तोडकामाचे सजीव चित्र रेखाटत होते. चार कलाकारांनी आपापल्या पद्धतीने कागदावर पुलाचे दृश्य चित्रित केले.

Web Title: Mission 'Chhatrapati' on the battlefield!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.