‘मिशन-१२५’ला ‘नाराजी’चे आव्हान
By Admin | Updated: January 11, 2017 02:45 IST2017-01-11T02:45:32+5:302017-01-11T02:45:32+5:30
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे.

‘मिशन-१२५’ला ‘नाराजी’चे आव्हान
भाजपमध्ये इच्छुकांची ‘मॅरेथॉन’ यादी : प्रस्थापितांविरोधात कार्यकर्त्यांची दावेदारी
योगेश पांडे नागपूर
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘मिशन-१२५’ हा संकल्प घेऊनच तयारी करण्यात येत आहे. इच्छुकांच्या संख्येनेदेखील विक्रम केला आहे. मात्र काही प्रभागांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रस्थापित नगरसेवकांविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे केवळ नाव नको तर काम लक्षात घेऊन तिकीट देण्यात यावे, अशी कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात मागणी होत आहे. तिकीटवाटपानंतर कार्यकर्त्यांनी ‘नाराजी’चे अस्त्र उगारू नये यासाठी पक्षातील धुरीण विशेष प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या भाजपाच्या तिकिटासाठी पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. यंदा ३ हजार १० जणांनी तिकिटासाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. खासदार, आमदार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांची चाळणी सुरू आहे.
प्रत्येक वेळी तिकिटांसाठी आजी-माजी नगरसेवकांसोबतच कार्यकर्तेदेखील इच्छुक असतातच. त्यामुळेच तिकीट मिळणार नाही, हे माहिती असूनदेखील ते अर्ज करतात. तिकीट वाटप जाहीर झाल्यावर सर्व पक्षासाठीच प्रचार करतात. मात्र यंदा शहरातील काही प्रभागात प्रस्थापितांविरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच प्रभागात चांगले नाव असलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीदेखील गंभीरतेने तिकिटांसाठी दावेदारी केली आहे.
अशा स्थितीत तिकीटवाटपानंतर अपेक्षितांना उमेदवारी मिळाली नाही, तर कार्यकर्ते नाराज होऊ शकतात व याचा फटका प्रचाराला बसू शकतो, ही बाब पक्षाचे नेते जाणून आहेत. त्यामुळेच तिकीट कुणालाही मिळाले तरी पक्षहिताला प्राधान्य देण्यात यावे असे, मुलाखतींना येणाऱ्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात येत आहे.
जिंकणार कोण, सर्वेक्षण की शिफारस?
पक्षाचे अंतर्गत राजकारण लक्षात घेता अनेकांना शहरातील मोठ्या नेत्यांनी तुम्हालाच उमेदवारी मिळेल असे तोंडी आश्वासन दिले आहे. अनेक इच्छुक तसा दावादेखील करीत आहेत. दुसरीकडे पक्षातर्फे सर्व प्रभागांत सर्वेक्षणदेखील करण्यात आले होते. त्यात आघाडीवर नावे येणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे पक्षनेत्यांनी छातीठोकपणे सांगितले होते. त्यामुळे सर्वेक्षणाला झुकते माप मिळते की शिफारस बाजी मारते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ‘आॅल इज वेल’ असल्याचा पक्ष पदाधिकारी दावा करीत असले तरी अनेक मोठ्या प्रभागातील कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धुसफूस त्यांना माहित आहे. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर ‘डॅमेज कंट्रोल’ची वेळ येऊ नये यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
पक्षाच्या उमेदवाराला सर्वांचाच पाठिंबा : कोहळे
तिकिटासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येतातच. यंदा तीन हजारांहून अधिक इच्छुकांतून उमेदवारांची निवड करायची आहे. एकाच प्रभागातून १० हून अधिक ज्येष्ठ व दिग्गज नावे असल्याचेदेखील दिसून येत आहे हे खरे आहे. मात्र व्यक्ती नव्हे तर आम्ही पक्षाला जास्त महत्त्व देतो व कार्यकर्त्यांचीदेखील हीच विचारसरणी आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व प्रभागात सर्व इच्छुकांना एकत्रितपणे घेऊन दोनदा जनसंपर्क केला आहे. त्यामुळे जर यदाकदाचित कुणी नाराज झालाच तर तो तिसऱ्यांदा पक्षाच्या विरोधात प्रचारास धजावणार नाही. तशी अशी आम्ही अगोदरच व्यवस्था केली आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असा दावा शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला.