मनपाकडून पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:34+5:302021-03-17T04:07:34+5:30
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेईना : सहा वर्षापासून रस्ता उखडलेलाच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामदासपेठ भागातील लोकमत ...

मनपाकडून पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेईना : सहा वर्षापासून रस्ता उखडलेलाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामदासपेठ भागातील लोकमत चौक ते बोधनकर चिल्ड्रेन हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता सहा वर्षांपासून नादुरुस्त आहे. यासंदर्भात तत्कालीन मुखयमंत्री, महापालिका प्रशासन व महापौर, पदाधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु रस्ता दुरुस्त झाला नाही. अखेर रामदासपेठ भागातील त्रस्त नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे या रस्त्याची तक्रार केली. महापालिका प्रशासनाला यावर स्पष्टीकरण मागितले. प्रशासनाने नवीन रस्ता केल्याची खोटी माहिती देऊन पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केली. पण रस्ता दुरुस्त केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात लोकमत चौक ते बोधनकर चिल्ड्रेन हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याचा यात समावेश होता. परंतु महापालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याचे कारण पुढे करून हा रस्ता रद्द करण्यात आला. सिमेंट कॉँक्रिटचा नाही तर किमान डांबरीकरण करणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने मागील सात-आठ वर्षांत साधी डागडुजी केली नाही. यामुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रामदासपेठ क्षेत्रात प्रमुख रुग्णालये आहेत. विदर्भासह शेजारील राज्यांतील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. याची जाणीव असूनही मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. वारंवार तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने त्रस्त नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार केली. याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने मनपा प्रशासनाला यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले. मनपा प्रशासनाने या रस्त्याचे काम झाले असल्याची चुकीची माहिती पाठविली.
....
रस्ता दुरुस्तीसाठी सहा वर्षात अनेकदा तक्रारी
लोकमत चौक ते बोधनकर चिल्ड्रेन हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता मागील आठ -दहा वर्षापासून दुरुस्त केलेला नाही. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रामदासपेठ भागात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत. येथे विदर्भासह शेजारील राज्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना त्रास होतो. रस्ता दुरुस्तीसंदर्भात सहा वर्षांपासून पाठपुरवा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दोन माजी महापौर, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु दखल घेतली नाही. अखेर पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. मनपा प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाची नवीन रस्ता झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. शहरातील अंतर्गत रस्ते चकाचक होत असताना वर्दळीचा रस्ता दुरुस्त होत नसल्याची खंत डॉ. उदय बोधनकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
......
अर्थसंकल्पात रस्त्यासाठी तरतूद करू
सिमेंट रोडच्या पहिल्या टप्प्यात लोकमत चौक ते बोधनकर हॉस्पिटल, देवनगर व मेडिकल चौक ते क्रीडा चौक दरम्यानच्या रस्त्यांचा समावेश होता. मात्र निधीअभावी या रस्त्यांचे काम रखडले. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात लोकमत चौक ते बोधनकर हॉस्पिटल या रस्त्याच्या कामासाठी आर्थिक तरतूद केली जाईल. तसेच तत्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात येतील अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली.
....