अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला आठ वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:27 IST2019-05-08T22:26:07+5:302019-05-08T22:27:03+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला आठ वर्षे कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला.
दिनेश गंगाधर चरपे (३०) असे आरोपीचे नाव असून तो मेंडला, ता. नरखेड येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२) अंतर्गत ८ वर्षे कारावास व ४००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४० दिवस अतिरिक्त कारावास, कलम ३६३ अंतर्गत ५ वर्षे कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २५ दिवस अतिरिक्त कारावास तर, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत ४ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २० दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
ही घटना १४ मे २०१७ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ११ वर्षे वयाची होती. आरोपीने पीडित मुलीला बळजबरीने गिट्टीखदानमधील मंदिरामागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पोलीस तक्रारीनंतर आरोपीला १५ मे रोजी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. दीपिका गवळी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांचे बयान व अन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध केला.