नागपुरात प्रेमभंगामुळे अल्पवयीन मुलीचे आत्मघाती पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 20:48 IST2019-08-19T20:47:21+5:302019-08-19T20:48:47+5:30

प्रेमभंग झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

A minor girl attempt to commits suicide after break up in love in Nagpur | नागपुरात प्रेमभंगामुळे अल्पवयीन मुलीचे आत्मघाती पाऊल

नागपुरात प्रेमभंगामुळे अल्पवयीन मुलीचे आत्मघाती पाऊल

ठळक मुद्देविष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न : पोलीस चौकशीतून उलगडा : सदरमध्ये प्रियकर गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमभंग झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या या आत्मघाती पावलामुळे तिच्या अल्पवयीन प्रेमकथेचा तसेच विनयभंगाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला अन् पोलिसांनी एका ओला चालकाला अटक केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
दर्शन श्रीवास्तव (वय २६) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो सदरमध्ये अवस्थी चौकाजवळ भाड्याच्या खोलीत राहतो. त्याला आईवडील नाही. तो ओला चालवतो. तक्रार करणारी युवती (वय १७) सध्या ११ वीत शिकते. ती वर्षभरापूर्वी दर्शनच्या घराशेजारी राहायची. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. त्यातून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध झाले. जून महिन्यात एके दिवशी दुपारी २ च्या सुमारास ती ओठावर उपचार करून घेण्यासाठी मेयोत गेली होती. परत येताना दिला दर्शन ऑटोस्टॅण्डजवळ दिसला. घरी सोडून देतो, असे सांगून त्याने तिला आपल्या कारमध्ये बसविले. इकडे-तिकडे फिरविल्यानंतर सायंकाळी ते कस्तूरचंद पार्कजवळ आले. तेथे त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर तिला तेथेच उतरवून देत तो पुढे निघून गेला आणि ती स्टार बसने घरी आली. रात्री ती नळावर पाणी भरत असताना पुन्हा दर्शन तिच्याजवळ आला आणि त्याने तिला पुन्हा आपल्या कारमध्ये बसवून बाहेर नेले. पुन्हा अंधाऱ्या ठिकाणी जाऊन त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले आणि निघून गेला. त्यानंतर ते दोघे प्रेमीयुगुलासारखे वागू लागले. १५ ऑगस्टला ती दर्शनच्या घरी गेली आणि तिने त्याला लग्नाची गळ घातली. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. प्रेमभंग झाल्यामुळे ती क्षुब्ध झाली अन् तिने घरी परतल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. तिला मेयोत दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर आईवडिलांनी तिला आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण विचारले, मात्र तिने कुणालाच काही सांगितले नाही. दरम्यान, डॉक्टरांकडून मिळालेल्या सूचनेनुसार सदर पोलीस मेयोत पोहचले. त्यांनी युवतीचे बयाण नोंदविताना तिला आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण विचारले. तिला विश्वासात घेऊन बोलते केले असता, तिने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आत्मघाती पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले.

Web Title: A minor girl attempt to commits suicide after break up in love in Nagpur