अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहात जुगार जिंकून केला होता खून
By Admin | Updated: November 10, 2015 03:33 IST2015-11-10T03:33:07+5:302015-11-10T03:33:07+5:30
केवळ ५०० रुपयांसाठी खून करणारा अल्पवयीन आरोपी नुकताच जुगार जिंकला होता. जुगारात जिंकल्याच्या उन्मादात त्याने मजूर तरुणाचा खून केला.

अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहात जुगार जिंकून केला होता खून
नागपूर : केवळ ५०० रुपयांसाठी खून करणारा अल्पवयीन आरोपी नुकताच जुगार जिंकला होता. जुगारात जिंकल्याच्या उन्मादात त्याने मजूर तरुणाचा खून केला. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत वाद असल्यामुळे मृत दिलीप ऊर्फ गोलू अहीरवारचे कुटुंबीय सोमवारी सकाळी वस्तीतील नागरिकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
१७ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी दुपारी २० वर्षीय दिलीपचा खून केला होता. पूर्ण प्रकरण जुगाराशी संबंधित होते. सकाळी ११ वाजता आरोपी दिलीपचा चुलतभाऊ राकेश आणि इतर मुलांसोबत क्रिकेट खेळला. यानंतर जुगार खेळण्यात आला. यात राकेशकडून तो ५०० रुपयांचा डाव जिंकला. त्याने राकेशला पैसे मागितले, परंतु त्याने नकार दिला. त्याच्या काही वेळानंतर तो त्याच्याकडे वारंवार पैशासाठी तकादा लावू लागला. राकेश पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आरोपीने वाद घातला. संपूर्ण प्रकरण माहीत असल्याने दिलीपने राकेशची बाजू घेत आरोपीला वाद न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात त्याचा खून केला. मृत दिलीपच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात षड्यंत्र असल्याचा आरोप करीत प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली.
अजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी हा अल्पवयीन नसून वयस्क असल्याची तक्रार केली. खरा प्रकार लपविण्यासाठी आरोपीला अल्पवयीन असल्याचे सांगितले जात असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यासही नकार दिला. पोलिसांनी खूप समजावल्यानंतर मृताचे कुटुंबीय शांत झाले. दरम्यान आरोपीला न्यायालयाने बाल सुधार गृहात पाठविले. (प्रतिनिधी)