मंत्री, अधिकाऱ्यांच्या सहलीवर बसणार चाप!
By Admin | Updated: December 7, 2014 00:28 IST2014-12-07T00:28:52+5:302014-12-07T00:28:52+5:30
हिवाळी अधिवेशन म्हणजे कामकाज कमी आणि सहलीच जास्त, अशी टीका दरवर्षी होते. शुक्रवारचे कामकाज आटोपले की शनिवार आणि रविवार नागपूरशेजारी असलेल्या पर्यटन स्थळावर मंत्री, अधिकाऱ्यांसाठी सहली

मंत्री, अधिकाऱ्यांच्या सहलीवर बसणार चाप!
हिवाळी अधिवेशन : शासकीय वाहन शहर सीमेच्या बाहेर नेण्यावर प्रतिबंध
नागपूर : हिवाळी अधिवेशन म्हणजे कामकाज कमी आणि सहलीच जास्त, अशी टीका दरवर्षी होते. शुक्रवारचे कामकाज आटोपले की शनिवार आणि रविवार नागपूरशेजारी असलेल्या पर्यटन स्थळावर मंत्री, अधिकाऱ्यांसाठी सहली आणि पार्ट्या आयोजित केल्या जातात. या मौजमजेसाठी शासकीय वाहने किंवा खाजगी वाहने शासकीय खर्चाने वापरली जातात. मात्र यावर्षी यावर चाप लावला आहे. अधिवेशन काळात शासकीय वाहने किंवा खाजगी वाहने शासकीय खर्चावर शहर सीमेच्या बाहेर नेण्यास शासनाने प्रतिबंध घातला आहे.
अधिवेशन काळात मंत्री, राज्यमंत्री, विधिमंडळ सचिवालयाचे अधिकारी यांच्यासाठी विभागीय अधिकारी विविध विभागांची वाहने अधिग्रहित करीत असतात. मागील वर्षी १२०० वाहने शासकीय कामासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. याच्या इंधनावर एक कोटी सहा लाख रुपये खर्च झाला. हा खर्च इतर दिवसांच्या तुलनेत शनिवार व रविवार या सुट्यांच्या दिवसात अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात सामाजिक संघटनांकडून होत असलेली टीका व तक्रारींची दखल घेत शासनाने शासकीय वाहनांच्या खाजगी वापरावर प्रतिबंध लावण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. दररोज ८० कि.मी.पेक्षा अधिक अंतरासाठी शासकीय वाहने वापरता येणार नाहीत, अशी तंबी दिली आहे. जरी शासकीय वाहन अधिवेशनाच्या काळात शहराच्या हद्दीबाहेर गेले तर त्याचे कारण विभागीय आयुक्तांना द्यावे लागणार आहे. आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतेही शासकीय वाहन शहराबाहेर नेता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नव्या निर्णयामुळे विशेषत: अधिकाऱ्यांच्या मौजमस्तीवर गंडांतर येणार असून, सहलीच्या दृष्टिकोनातून आलेल्यांना सुटीच्या दिवशी शहरातच थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)