मंत्री पोहोचले विमा रुग्णालयात
By Admin | Updated: December 8, 2015 04:28 IST2015-12-08T04:28:43+5:302015-12-08T04:28:43+5:30
दीडलाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणारे सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना

मंत्री पोहोचले विमा रुग्णालयात
नागपूर : दीडलाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणारे सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला अखेरची घरघर लागली आहे. विविध संवर्गातील सुमारे ७० टक्के रिक्तपदांमुळे रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे वृत्त रविवारी लोकमतने ‘दीडलाख कामगार कुटुंबीयांचे आरोग्य आॅक्सिजनवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याची दखल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतली. सायंकाळी या रुग्णालयाला आकस्मिक भेट देत येथील सोयींच्या अभावावर आश्चर्य व्यक्त केले.
नागपूर जिल्ह्यात सुमारे तीन हजार लहान मोठे उद्योग आहेत. यात सुमारे १ लाख ६४ हजार ८४० हजार कामगार आहेत. उद्योग व कारखान्यात शिसे, फॉस्फरस, सफ्लाईन, बेझिंन, मॅगनिज इत्यादी घातक रसायने व नायट्रटेच्या धुरामुळे कामगारांना छातीचे तसेच इतरही आजार होतात. त्यांचे आरोग्य सांभाळले जावे म्हणून १९७० मध्ये नागपुरात हे कामगार रुग्णालये स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वार्षिक अंदाजपत्रकनुसार सुमारे १२ कोटी ७७ लाख रुपये शासनाकडे जमा होतात. परंतु येथे आकस्मितरीत्या भरती झालेल्या व मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर उपचारच होत नाहीत. गुंतागुंतीच्या प्रसूतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खासगी रुग्णालयांची रुग्णांना वाट धरावी लागते. विविध संवर्गातील ३३२ पदे मंजूर असताना गेल्या अनेक वर्षांपासून १७८ पदे रिक्त आहेत.
यामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, असे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्ताने रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रविवार सुटीचा दिवस असतानाही राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून समस्येची माहिती घेतली. तर सोमवारी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आकस्मिक भेट दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंत यांच्या या भेटीची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हती. अचानक पोलिसांच्या ताफ्यासह मंत्र्यांची उपस्थिती पाहता तारांबळ उडाली. यावेळी सावंत यांनी बाह्यरुग्ण विभाग, वॉर्ड, सोनोग्राफी कक्ष आदींची पाहणी केली. रुग्णालयातील दोन वॉर्ड बंद असल्यावर नाराजीही व्यक्त केली. मंत्र्यांनी रिक्त पदे भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
यावेळी त्यांच्या भेटीत जे.पी.गुप्ता, वैद्यकीय संचालक डॉ. गणेश जाधव, विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जे.एस. जोेगेवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डुलके, यांच्यासह अनेक डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)