मंगळवारी ठरणार मिनी महापौर : ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 22:32 IST2021-02-11T22:30:27+5:302021-02-11T22:32:07+5:30
Mini mayor election मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या झोन सभापतींची निवडणूक येत्या मंगळवारी होत आहे. सर्व १० झोनची निवडणूक ही एकाच दिवशी पार पडणार आहे.

मंगळवारी ठरणार मिनी महापौर : ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिनी महापौर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या झोन सभापतींची निवडणूक येत्या मंगळवारी होत आहे. सर्व १० झोनची निवडणूक ही एकाच दिवशी पार पडणार आहे. प्रत्येक सभापतीच्या निवडीसाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया ही सकाळी ११ वाजता सुरू होऊन २.१५ वाजेपर्यंत चालेल. सभापतीपदासाठी सत्तापक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
२०२२ मध्ये मनपा निवडणूक आहे. अखेरचे वर्ष असल्यामुळे या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आमदारांमार्फत अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. महापालिकेच्या १५२ सदस्यांपैकी १०८ सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूण १० पैकी ८ झोनमध्ये भाजपचा सभापती निश्चित आहे. आशीनगर बसपा तर मंगळवारी झोन येथे काँग्रेसचे सभापती आहेत. मात्र मंगळवारी झोनमध्ये भाजपच्या समर्थनातून सभापती गार्गी चोप्रा या सभापती झाल्या होत्या. वास्तविक, तांत्रिकदृष्ट्या ही जागा काँग्रेसचीच आहे. परंतु, मागील चार वर्षांत चोप्रा या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात गेलेल्या नसल्याने त्या भाजपच्याच सदस्या असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे, मंगळवारी झोनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समिती सदस्यांची निवड
येत्या १ मार्च रोजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांचा कार्यकाळ संपत आहे. सोबतच समितीचे १६ पैकी ८ सदस्य निवृत्त होणार आहेत. या जागेवर ८ नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल. १८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महासभेत ८ सदस्यांसह स्थायी समिती सभापतींची घोषाणा होण्याची शक्यता आहे.