जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
By Admin | Updated: April 26, 2015 02:17 IST2015-04-26T02:17:20+5:302015-04-26T02:17:20+5:30
जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील येरखेडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, गोधनी, सावनेर, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, चनकापूर, सिल्लेवाडा, भानेगाव, दहेगाव (रंगारी),

जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
नागपूर : जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील येरखेडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, गोधनी, सावनेर, सावनेर तालुक्यातील खापरखेडा, चनकापूर, सिल्लेवाडा, भानेगाव, दहेगाव (रंगारी), वलनी तसेच पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे शनिवारी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० वाजताच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळे या गावांमधील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूूकंपाच्या धक्क्याची अधिकृत नोंद नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
कोराडीनजीकच्या गोधनी येथे सकाळी ११.५० वाजताच्या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती महाजन कॉम्प्लेक्सचे संचालक संदीप इंगोले यांनी दिली. आपण कार्यालयात बसलो असता, खुर्ची हलल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. भीतीपोटी या कॉम्प्लेक्समधील नागरिक घराबाहेर पडले होते. दाढी करीत असताना आरसा हलल्याची माहिती गोधनी येथील अमित पाथरे यांनी दिली. कामठी तालुक्यातील भिलगाव, खसाळा, न्यू येरखेडा, रनाळा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे काहींनी सांगितले. घरी पेपर वाचत असताना सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास खुर्ची हालल्याचा अनुभव आल्याची माहिती न्यू येरखेडा येथी सुषमा राखडे आणि रनाळा येथील रजनी ठवकर यांनी दिली. भूकंपाचे कंपन जाणवल्याची माहिती भिलगाव येथील सुमन विहार वसाहतीतील रहिवासी शिवचरण शंभरकर व खसाळा येथील झी स्कूलचे शाखा व्यवस्थापक विलास कार्लेकर यांनी दिली. कार्यालयात कंपन आल्याची माहिती कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी दिली. दरम्यान, घरातील रॅकमधील भांड्यांना कंपन आल्याचे छावणी परिसरातील सीमा यादव व रचना बिल्लरवार यांनी सांगितले. या भूकंपाच्या वृत्ताला कामठीचे तहसीलदार डी. एस. भोयर यांनी दुजोरा दिला असून, अधिकृत नोंद नसल्याचे सांगितले.
सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसर, प्रकाशनगर कॉलनी तसेच चनकापूर भागात शनिवारी सकाळी ११.४० वाजताच्या सुमाराससौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. सदर धक्के ४० सेकंदापर्यंत अनुभवल्याची माहिती काहींनी दिली. काहींनी घरातील भांडी हलल्याची तर काहींनी रोडवर चालताना भोवळ आल्यासारखे वाटल्याचे सांगितले. त्यामुळे या भागातील नागरिक लगेच घराबाहेर पडले होते. कन्हान शहरात शनिवारी सकाळी ११.४८ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांसह व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, शहरातील गणेशनगर, हनुमाननगर, तारसा चौक, डॉ. आंबेडकर चौक या भागात भूकंपाचे धक्के अनुभवल्याची माहिती मधू जयस्वाल, जगमोहन कपूर, प्रशांत पाटील यांच्यासह अन्य नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)