मिहान प्रकल्पग्रस्तांची एमएडीसीवर धडक
By Admin | Updated: June 11, 2015 02:57 IST2015-06-11T02:57:32+5:302015-06-11T02:57:32+5:30
शिवणगावातील १०० पेक्षा जास्त पुरुष व महिला प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी मिहानमधील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ...

मिहान प्रकल्पग्रस्तांची एमएडीसीवर धडक
नागपूर : शिवणगावातील १०० पेक्षा जास्त पुरुष व महिला प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी मिहानमधील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) कार्यालयावर धडक दिली आणि घराच्या मोबदल्याची मागणी केली. हा विषय राज्य शासनाच्या अख्यत्यारित असून यावर लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती एमएडीसीचे मुख्य अभियंते सुभाष चहांदे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
या प्रश्नावर ३० जूनपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी चहांदे यांना दिला. यावेळी एमएडीसीचे पुनर्वसन अधिकारी अशोक चौधरी उपस्थित होते. शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिचभुवन येथे होणार आहे. ३ हजार, १५०० आणि १ हजार चौरस फूट असे विकसित प्लॉट प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे. विकास कामांना सुरुवातही झाली आहे.
वेळोवेळी आश्वासन
डवरे म्हणाले, टॅक्सी-वे होऊ द्या, मोबदला देतो, असे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले होते. या आश्वासनाला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. जवळपास १२०० घरांना मोबदला हवा आहे. त्यापैकी गावठाणमधील सुमारे ४०० घरांना मोबदला मिळाला आहे. उर्वरित घरांचा मोबदला अद्याप प्रलंबित आहे. सरकार बदलल्याने निर्णय प्रलंबित असल्याचे अधिकारी सांगतात, तर दुसरीकडे मंत्री बैठकीत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेतात. टॅक्सी-वे पूर्ण झाला आणि कार्यान्वितही झाला, पण प्रकल्पग्रस्तांना घरांचा मोबदला मिळालेला नाही. ही रक्कम १० कोटींच्या घरात आहे. वेळोवेळी आश्वासन मिळत असल्याने गावकऱ्यांनी बुधवारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला. ३० जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्त तीव आंदोलन उभारणार असल्याचे डवरे म्हणाले. (प्रतिनिधी)