नागपूर : शहरातील दूषित पाणी शुद्धीकरणासाठी मिहानच्या मलनिस्सारण केंद्रात (एसटीपी) पाठविण्यात येणार आहे. केंद्राची क्षमता २४ एमएलडी असून त्यासाठी सोनेगाव पोलीस स्टेशनजवळून मिहान मलनिस्सारण केंद्रापर्यंत ५०० मिलिमीटर व्यासाची सहा किलोमीटरची मलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या योजनेवर १८.३८ कोटी रुपये खर्च येणार असून हा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीत येणार आहे. शहरातील नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयातर्फे वेळोवेळी आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकरणी आवश्यक दिशानिर्देश दिले आहेत. यासाठी मिहानच्या केंद्रात दूषित पाणी शुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सोनेगाव पोलीस स्टेशनजवळील नाल्यावर बांध टाकण्यात येणार आहे. नाल्यातून गडरचे पाणी काढण्यात येईल. स्क्रिन चेंबर, पंप हाऊस तयार करण्यात येतील. येथून घाण पाणी पंप हाऊसने मिहानपर्यंत नेण्यात येईल. (प्रतिनिधी)
मिहान ‘एसटीपी’त होणार दूषित पाणी शुद्ध
By admin | Updated: May 11, 2014 01:22 IST