‘मिहान’मधील निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:39+5:302021-03-04T04:11:39+5:30

वसीम कुरैशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘मिहान’मध्ये मागील काही दिवसापासून अक्षरश: शांतता जाणवून येत आहे. जवळपास १४ ‘आयटी’ ...

Mihan exports up 70 per cent | ‘मिहान’मधील निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ

‘मिहान’मधील निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ

वसीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘मिहान’मध्ये मागील काही दिवसापासून अक्षरश: शांतता जाणवून येत आहे. जवळपास १४ ‘आयटी’ कंपन्यांमधील ९५ टक्के कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. यामुळे कार्यालयातील मर्यादित वेळेच्या तुलनेत घरातून जास्त काम होत आहे. सोबतच ‘फार्मा’ कंपन्या व ‘एव्हिएशन’ क्षेत्रातील कंपन्यांनी मर्यादित संख्येत कर्मचाऱ्यांना कामावर बोलविले. मात्र उत्पादन वाढले. यामुळे निर्यातीत ७० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

सर्व ‘आयटी’ कंपन्यांमधील बहुतांश कर्मचारी कार्यालयात येत नसल्याने व इतर कंपन्यांमध्ये मर्यादित कर्मचारी असल्याने परिसरात दिवसभर शांतता दिसून येते. सर्व कंपन्यांमधील जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांमधील १५ हजाराहून अधिक जण घरूनच काम करीत आहेत. ‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’च्या ‘सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग’मध्ये असलेल्या ‘आयटी’ कंपन्यांमध्ये केवळ स्वच्छता कर्मचारी व कधी कधी ‘एचआर’चे कर्मचारी दिसतात. यामुळेच या इमारतीतील उपाहारगृहदेखील बंद आहे. परिसरातील टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. त्यांची वाहनेच चालत नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोरोना’मुळे काही कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. मोठी जागा घेऊन आतापर्यंत बांधकाम सुरू करू न शकलेल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची प्रतीक्षाच आहे. एकूणच तेथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात वाढ झालेली नाही. याचा फटका ‘मेट्रो रेल्वे’ला बसतो आहे. ‘मिहान’ परिसरात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तर त्यांना जास्त प्रवासी मिळू शकतात. आता तर ‘मेट्रो’च्या खापरी स्थानकापासून ‘मिहान’साठी ‘शटल बससेवा’देखील सुरू झाली आहे.

मुख्यालयाकडून गंभीरता अपेक्षित

विदर्भातील मोठ्या प्रकल्पावर एमएडीसीच्या मुख्यालयातून विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याचे सांगितले जात आहे. जमीन मिळविणाऱ्या कंपन्यांकडून बांधकाम पूर्ण करविणे, नवीन कंपन्यांना जमीन देण्यासंबंधी कंत्राट आणि लहान भूखंडांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मुख्यालयस्तरावर जर नागपूर ‘मिहान’च्या ‘मार्केटिंग’साठी गंभीरतेने पुढाकार घेण्यात आला तर चित्र बदलू शकते.

कंपन्यांचे काम वाढले

‘कोरोना’ कालावधीत ‘मिहान’मधील कंपन्यांच्या निर्यातीमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. यादरम्यान कंपन्यांचे काम वाढले आहे. विशेष म्हणजे ‘आयटी’ कंपन्यांचे ९५ टक्के कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ असूनदेखील निर्यात वाढली आहे.

-दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी

Web Title: Mihan exports up 70 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.