उत्साही मतदारांचा ‘मध्य’वेध
By Admin | Updated: October 16, 2014 00:57 IST2014-10-16T00:57:19+5:302014-10-16T00:57:19+5:30
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांचा येथे विशेष उत्साह पाहायला मिळाला.विशेषत: सकाळी पाऊस असतानादेखील मतदार मतदान

उत्साही मतदारांचा ‘मध्य’वेध
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांचा येथे विशेष उत्साह पाहायला मिळाला.विशेषत: सकाळी पाऊस असतानादेखील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. संघाचा बालेकिल्ला आणि सर्वात जास्त मुस्लीम मतदार असलेल्या या क्षेत्रात प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. एकूणच ५७ टक्के मतदान झाले व उत्साही मतदारांनी मध्यच्या जागेचे ‘लक्ष्य’वेध केले.
या मतदारसंघात वयोवृद्ध, अंध व अपंग मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार बजावला. पावसातदेखील ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून आला, हे विशेष. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी कुटुंबीयासह सकाळी १० वाजता महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉल कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला.
मध्य नागपूर मतदारसंघातील महाल, इतवारी, मोमीनपुरा, गोळीबार चौक, टिमकी या भागांमध्ये दिवसभर उत्साह दिसून आला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर अ़नेक मतदार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुस्लिमबहुल भागांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. विशेष म्हणजे महिला शेजारपाजारच्या नागरिकांनादेखील मतदानाचे आवाहन करताना दिसून आल्या.
महिलांचा उत्साह
पावसामुळे सुरुवातीला दोन तास मतदान संथ होते; सकाळी १० नंतर मध्य नागपुरातील बहुतांश केंद्रांवर चांगली गर्दी दिसून येत होती. अनेक केंद्रांवर ४ वाजेनंतर मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती. मोमीनपुरा व हंसापुरी भागातील मतदान केंद्रावर मतदानासाठी महिलांचा विशेष उत्साह दिसून येत होता. यात नवमतदारांसोबतच ज्येष्ठ महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश होता.
अरुंधतीचे ‘गेट,सेट,व्होट’
सिरसपेठ येथील लोकांची शाळा येथील मतदान केंद्रावर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व जिल्हा निवडणूक आयोगाची ‘ब्रॅन्ड अॅम्बेसडर’ अरुंधती पानतावणे हिने कुटुंबीयांसोबत मतदान केले. मतदान हीच खरी राष्ट्रसेवा आहे. लोकशाही बळकट करण्याची ही संधी असते व योग्य जनप्रतिनिधी निवडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी व विशेषत: तरुण-तरुणींनी जास्तीतजास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन तिने यावेळी केले. विविध स्पर्धांमुळे नेहमी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असणाऱ्या अरुंधतीने यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला हे विशेष.
कडेकोट बंदोबस्त
शहरातील सर्वाधिक संवेदनशील मतदानकेंद्र असलेल्या मध्य नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोमीनपुरा परिसरातील मनपा मोमीनपुरा मुलांची उर्दू शाळा तसेच जवळपासच्या मतदानकेंद्रांवर चोख पोलीस व्यवस्था होती. पोलिसांचे गस्तीपथकही या भागात ठेवण्यात आले होते. याशिवाय साध्या वेषातील पोलिसदेखील येथे पाहणी करत होते.