लॉकडाऊन उठताच सावरत आहेत सुक्ष्म-लघुउद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:31+5:302021-06-27T04:06:31+5:30
- संक्रमणाची धास्ती अजूनही कायम : हळूहळू वाढत आहे वस्तूंची विक्री लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण आणि ...

लॉकडाऊन उठताच सावरत आहेत सुक्ष्म-लघुउद्योग
- संक्रमणाची धास्ती अजूनही कायम : हळूहळू वाढत आहे वस्तूंची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण आणि त्यायोगे लागू होत असलेले दीर्घकालीन लाॅकडाऊनमुळे लहान, मोठे सर्वच उद्योग ठप्प पडलेले होते. संक्रमणाचा ज्वर ओसरला असला तरी धास्ती अजूनही कायम आहे. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर लागलेल्या लाॅकडाऊनमुळे रखडलेले सूक्ष्म व लघुउद्योगातील व्यवहार आता पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे आहेत.
कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरताच दुसरे दीर्घकालीन लॉकडाऊन २१ जून रोजी उघडले. बाजारात त्याचा आनंद दिसून येत आहे. याच बाजारांवर व मोठ्या उद्योगांवर निर्भर असलेले सूक्ष्म व लघुउद्योगही नवसंजीवनी मिळाल्यागत व्यवहार करण्यास सिद्ध झाले आहेत. खादी उद्योगाशी जुळलेले आणि स्वतंत्ररीत्या गृहउद्योग करणारे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील उद्योजकांची उत्पादने आता नव्याने सुरू झाली आहेत. त्यामुळे, रोजगाराच्या संधीही नव्याने उपलब्ध होत आहेत.
------------------
विदर्भात गृहउद्योगाची वार्षिक उलाढाल कोट्यवधींची
नोंदणीकृत आकडेवारीनुसार विदर्भात २५०० पेक्षा जास्त गृहउद्योग आहेत. हिच संख्या नागपुरात ५००पेक्षा जास्त आहे. विदर्भात गृहउद्योगांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. अनेक महिला व पुरुष लोणचे, पापड, तिखट, मसाला, शॅम्पू, मेंदी, उदबत्ती, वॉशिंग पावडर आदींची उत्पादने तयार करतात. लॉकडाऊनमुळे या सूक्ष्म उद्योगांवर विरजण पडले होते. अनेक युनिट बंद पडले होते. मात्र, आता पुन्हा त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
----------
तुटलेली साखळी पुन्हा जोडण्यावर भर
लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या उद्योगांची साखळी तुटली आहे. अनलॉक होताच हे लहान उद्योजक पुन्हा नव्याने ती साखळी जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. इतक्यात गाडी रुळावर येणार नसली तरी त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होत आहेत.
-------------
शासनाकडून मदतीची अपेक्षा
सूक्ष्म व लघुउद्योगांवर मोठ्या प्रमाणात रोजगार विसंबून आहे. त्याअनुषंगाने या उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
..................