मनरेगा कर्मचाऱ्याचा रामगिरीवर मोर्चा
By Admin | Updated: August 28, 2016 02:25 IST2016-08-28T02:25:36+5:302016-08-28T02:25:36+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची

मनरेगा कर्मचाऱ्याचा रामगिरीवर मोर्चा
नोकरीची सुरक्षा देण्याची मागणी : पाच हजार आंदोलनकर्ते सामील
नागपूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची हमी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी यशवंत स्टेडियम येथून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानावर मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यभरातून आलेले ५००० च्या जवळपास आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व मनरेगा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ओंकार जाधव, सरचिटणीस राजन क्षीरसागर, उपाध्यक्ष संतोष राठोड यांनी केले. लोकमतशी बोलताना संतोष राठोड यांनी सांगितले की, मनरेगाचे अनेक कर्मचारी गेल्या दहापेक्षा जास्त वर्षापासून या योजनेंतर्गत सेवा देत आहेत. यातील बहुतेकांनी नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र कंत्राटी तत्त्वावर काम करीत असल्याने त्यांना नोकरीची कुठलीही हमी मिळत नाही. शिवाय शासकीय सेवा सवलतीही मिळत नाही. अचानक नोकरीवरून काढण्यात येत असल्याने कुटुंबाच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामरोजगार सेवकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची टीम बदलली की, रोजगार सेवकालाही काढण्यात येते. सरकारने या कर्मचाऱ्यांचा अनुभव गृहीत धरून त्यांच्या कायम नोकरीची हमी देण्याचा निर्णय घ्यावा.
संघटनेच्यावतीने सर्व कंत्राटी नरेगा कर्मचाऱ्यांसाठी एकसमान धोरण लागू करावे, या योजनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोकरीची हमी देण्यात यावी, मग्रारोहच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्य करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय योजनेनुसार वेतन देण्यात यावे, कामाचा विचार करून बढती मिळावी, नरेगा कर्मचाऱ्यांना कामाचे अधिकार मिळावे, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका तयार करण्यात यावी आणि ग्रामरोजगार सेवकांना दरमाह १० हजार रुपये वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या.
पोलिसांनी मोर्चाला संविधान चौकात थांबविले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सभा घेतली. यानंतर प्रतिनिधी मंडळाने नरेगा आयुक्त कार्यालयात जाऊन उपायुक्तांशी भेट घेतली व मागण्यांचे निवेदन सोपविले.(प्रतिनिधी)