मेट्रोे रेल्वेला नासुप्रचे बूस्ट !
By Admin | Updated: March 12, 2015 02:33 IST2015-03-12T02:33:30+5:302015-03-12T02:33:30+5:30
नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

मेट्रोे रेल्वेला नासुप्रचे बूस्ट !
नागपूर : नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यात मेट्रो रेल्वेला चालना देण्यासह मेट्रो रिजन व अविकसित ले-आऊटच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. नागपूरकरांसाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वेसाठी वर्धने यांनी अर्थसंकल्पात १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या तरतुदीमुळे येत्या काळात मेट्रोरेल्वेच्या कामाची गती वाढण्याचे सिग्नल मिळाले आहेत. तर नागपूर मेट्रो रिजनसाठीही ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने शहराच्या बाह्य भागातही नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार आहे.
नासुप्रचा गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प ८१२ कोटींचा होता. यावर्षी त्यात १८ कोटींची भर पडली. अपेक्षित उत्पन्नात भांडवली जमा ४२०.६४ कोटी, महसुली जमा ३३२.७५ कोटी तसेच अग्रिम व ठेवी जमाचे ७५.७५ कोटी रुपयांचा समावेश आहे. या एकूण उत्पन्नापैकी तब्बल ८२६.२९ कोटी रुपयांचा भांडवली व महसुली खर्च गृहित धरण्यात आला आहे. वर्धने यांनी अर्थसंंकल्पात नासुप्रतर्फे यापूर्वी हाती घेण्यात आलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला असून काही प्रकल्प सार्वजनिक खासगी सहभागातून पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी नासुप्र ही नोडल एजंसी आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कंपनीने सादर केलेला डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) नासुप्रने २८ नोव्हेंबर २०१३ रोजी राज्य शासनाला सादर केला होता. राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ रोजी त्याला मंजुरी दिली. पाठोपाठ २१ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारनेही मंजुरी देत केंद्रीय अर्थसंकल्पात १४४ कोटींची तरतूद केली.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन कंपनी लि.’ची स्थापना करण्यात आली असून राज्य सरकारने व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती केली आहे. या प्रकल्पावर ८६८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. १३ मार्च रोजी दिल्ली येथे नवनियुक्त मेट्रो रेल कॉर्पोरेशनची बैठक होत आहे. तीत या प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित होईल. मेट्रो रेल्वे प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करायचा आहे. प्रकल्पासाठी खासगी जागेची फारशी गरज नसल्यामुळे भूसंपादनातही अडचणी येणार नाहीत, त्यादिशेने वेगात काम सुरू असल्याचा दावा सभापती श्याम वर्धने यांनी केला.(प्रतिनिधी)