मेट्रो रेल्वेच्या कामाची गाडी सुपरफास्ट
By Admin | Updated: January 4, 2017 02:30 IST2017-01-04T02:30:12+5:302017-01-04T02:30:12+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत. ३८.२१५ कि़मी.

मेट्रो रेल्वेच्या कामाची गाडी सुपरफास्ट
८२.७१ टक्के जागा ताब्यात : एकूण ८,६८० कोटींची गुंतवणूक : ५० टक्के रक्कम कर्जस्वरूपात
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत. ३८.२१५ कि़मी. लांबीचा हा प्रकल्प ८,६८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा होणार आहे. प्रकल्पासाठी ५० टक्के रक्कम कर्जस्वरूपात मिळणार आहे. आतापर्यंत ८२.७१ टक्के जमीन कंपनीला हस्तांतरित झाल्याने प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या अपेक्षा बळावल्या आहेत.
४८० कोटी रुपयांची कामे सुरू
एकूण गुंतवणुकीत २० टक्के वाटा केंद्र सरकार, २० टक्के वाटा राज्य सरकार आणि नासुप्र व मनपाचा प्रत्येकी ५ टक्के वाटा आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएमआरसीएल) आतापर्यंत ७४०.१७ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात केंद्र सरकारचे ४७० कोटी, राज्य सरकारचे २२१.४५ कोटी, नागपूर सुधार प्रन्यासचा ४८.२५ कोटींचा वाटा आहे. त्यातून ४८० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. मनपाने रोख रक्कम न देता जागेच्या स्वरूपात आपला वाटा दिला आहे.
एप्रिलमध्ये पहिला पिलर उभा
वर्धा मार्गावर पिलर उभारणीचे काम सुरू असून, हे काम एनसीसी कंपनीला मिळाले आहे. दीक्षाभूमीजवळ कंपनीची प्रशासकीय इमारत उभी राहात आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना १८ फेब्रुवारी २०१५ रोजी झाली. उत्तर-दक्षिण १९.६५८ कि़मी. आणि पूर्व-पश्चिम १८.५५७ कि़मी. मार्गावर ३६ स्थानके राहतील. एप्रिल २०१५ मध्ये वर्धा मार्गावर पहिला पिलर उभा राहिला, तर आॅगस्ट २०१६ मध्ये पहिला गर्डर टाकण्यात आला. खापरी येथील पहिल्या स्थानकाचे काम आॅगस्ट २०१६ मध्ये, तर हिंगणा रोडवरील पहिल्या स्थानकाचे काम सप्टेंबर २०१६ ला सुरू झाले. मिहान येथील पहिल्या डेपोच्या बांधकामाचा प्रारंभ डिसेंबर २०१६ ला झाला. सर्व कामे अनुभवी कन्स्लटंटच्या देखरेखीखाली सुरू आहेत.
एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के रक्कम कर्जस्वरूपात राहील. जर्मनीच्या ‘केएफडब्ल्यू’सोबत ३,८५० कोटी रुपये (५०० दशलक्ष यूरो) कर्जासाठी एप्रिल २०१६ मध्ये आणि ९७५ कोटी रुपये (१३० दशलक्ष यूरो) कर्जासाठी फ्रान्सच्या एएफडी संस्थेसोबत नोव्हेंबर २०१६ मध्ये करार करण्यात आला. (प्रतिनिधी)
सीताबर्डी स्थानक आयकॉनिक ठरणार
या प्रकल्पांतर्गत झिरो माईल्स आणि सीताबर्डी स्थानके आयकॉनिक राहणार आहेत. यासाठी कंपनीने फ्रेंच आर्किटेक्ट ‘एनिया’ कंपनीची आणि जनरल कन्सलटंट म्हणून सिस्ट्रा, राईट्स, एजिस रेल आणि एकॉम या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत म्हणून एनएमआरसीएल आणि ब्यूरो आॅफ व्हेरिटस यांनी प्रयोगशाळा स्थापनेसाठी करार केला आहे.
याशिवाय मेट्रो रेल्वेचे कोच निर्मितीसाठी केंद्र सरकार आणि चीनच्या सीआरआरसीसोबत करार केला आहे. त्याअंतर्गत नागपूर येथे कोच निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच वर्धा रोडवर ३.५ कि़मी. आणि कामठी रोडवर ४ कि़मी. उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे.
मेट्रो रेल्वेसाठी गिट्टी टाकण्याचे कार्य सुरू
मिहान डेपो ते एअरपोर्ट मेट्रो स्थानक
मेट्रो रेल्वे मिहान डेपो ते एअरपोर्ट मेट्रो स्थानकापर्यंत जमिनीवर धावणार आहे. या ५.६ कि़मी. लांबीच्या मार्गावर रुळासाठी गिट्टी टाकण्याचे काम २७ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. या कामात २० हजार क्युबिक मीटर गिट्टी लागणार आहे.
यासाठी लागणारे प्री-ट्रेस काँक्रिट स्लीपर ग्वाल्हेर येथील एन्जीप्रेस स्लीपर प्रकल्पात तयार करण्यात येत आहेत. तसेच रायगड येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून स्टील रेलचा पुरवठा होणार आहे. गिट्टी टाकण्याच्या कामानंतर ट्रॅकचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण कामे यावर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होतील.