मेट्रो रेल्वे हा जनतेचा प्रकल्प

By Admin | Updated: March 23, 2015 02:32 IST2015-03-23T02:32:37+5:302015-03-23T02:32:37+5:30

प्रत्येक नागपूरकरांना आपलीशी वाटावी अशी मेट्रो राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ‘माझी मेट्रो’ या मानचिन्हाचे ..

Metro Rail project of the people | मेट्रो रेल्वे हा जनतेचा प्रकल्प

मेट्रो रेल्वे हा जनतेचा प्रकल्प

नागपूर : प्रत्येक नागपूरकरांना आपलीशी वाटावी अशी मेट्रो राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या ‘माझी मेट्रो’ या मानचिन्हाचे तसेच संकेतस्थळाचे लोकार्पण करताना व्यक्त केला. नागपूरचा चेहरामोहरा बदलविणार हा प्रकल्प सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगात होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कंपनीच्या अस्थायी कार्यालयाचेही उद्घाटन यावेळी झाले. सिव्हिल लाईन्स परिसरात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार्यालयात झालेल्या समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे अध्यक्षस्थानी होते. विशेष उपस्थितीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, खासदार अविनाश पांडे, महापौर प्रवीण दटके, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, नागो गाणार, प्रा. अनिल सोले, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनुपकुमार, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

काम गतिशील राहणार
मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रो रेल्वेसाठी जमीन संपादित करताना एकही वाद नागपूरकरांनी उपस्थित न करता माझी मेट्रो ही संकल्पना स्वीकारून देशात एक नवा पायंडा निर्माण केला आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे मी विशेष आभार व अभिनंदन करतो. मेट्रो रेल्वेच्या उभारणीसाठी ४९१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे कामाच्या गतीत कुठेही खंड पडणार नाही, अशी मला खात्री वाटते. शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्ते विकासावर विशेष भर देण्यात येईल. विदेशात कोट्याधीश मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर वर्ल्डक्लास सिटी बनणार
नागपूर शहराला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी एम्स, आयआयएम, मेट्रो रेल्वे, लॉ स्कूल यासारखे पाच प्रकल्प नागपुरात कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे उद्योगवाढीस याचा नक्कीच फायदा होईल. गडकरी हे मिहानच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असल्याने मिहानला गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दोन दिवसात रस्त्यांसाठी १०० कोटी
नागपुरातील रस्ते उत्तम बनविण्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात येणार ओह. दोन दिवसात जीआर काढण्यात येईल. उर्वरित ५० कोटी रुपये नासुप्रला द्यावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मानकापूर अंडरपासला मंजुरी
मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने मानकापूर अंडरपासला मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्राने १७.३८ कोटींची तरतूद केली आहे. पुढील आठवड्यात काम सुरू होणार आहे. बृजेश दीक्षित यांनी प्रास्ताविक भाषण व पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘माझी मेट्रो’ या मानचिन्हाचे अनावरण केले, तसेच संकेतस्थळाचे लोकार्पण केले. संकेतस्थळाविषयी कपिल चंद्रायण यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. या समारंभास नासुप्रचे अधीक्षक अभियंता एस. गुज्जलवार, नागपूर मेट्रो रेल्वेचे कार्यकारी अभियंता आनंदकुमार, सहायक कार्यकारी अभियंता येल्कावार, सीए संस्थेचे जुल्फेश शाह, अतुल कोटेचा, जयप्रकाश गुप्ता आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागपुरात बस पोर्ट तयार होणार
बस पोर्टच्या स्वरुपात बस स्टँडचा विकास करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याचे नितीन गडकरी म्हणाले तर मुख्यमंत्र्यांनी यावर्षीच्या बजेटमध्ये बस पोर्ट विकसित करण्याची तरतूद केल्याचे सांगितले. नागपूरचे मुख्य बस स्टँड बस पोर्टच्या स्वरुपात विकसित करण्यात येणार आहे.
अविकसित ले-आऊटसाठी २७८ कोटी
नागपूर सुधार प्रन्यासच्या ३ हजार अविकसित ले-आऊटमधील अर्धवट कामांसाठी २७८ कोटींची गरज आहे. यासाठी सरकार नासुप्रला १०० कोटींचा पहिला हप्ता देणार आहे. दुसऱ्या हप्त्यात आणखी निधी देण्यात येईल. उर्वरित निधीची तरतूद नासुप्रला करायची आहे.
‘डबल इंजिन’ने नागपूरचा चेहरामोहरा बदलणार
गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मला केंद्रात मिळालेल्या जबाबदारीने नागपूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मी आणि देवेंद्र असे ‘डबल इंजिन’ मिळाले आहे. या इंजिनच्या भरोशावर नागपूरचा विकास करण्याचा प्रयत्न राहील.
प्रकल्प वेळेत पूर्ण  होणार : गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात नागपूर मेट्रोच्या कामास तीन महिन्यात सुरुवात होईल व हा प्रकल्प २०१८ या वर्षाच्या आत पूर्ण होऊन नागपूरकर मेट्रोतून फिरतील, असा विश्वास व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पाचा विस्तार व्हावा, अशी मागणीही जनतेतून होत आहे. टप्पा-२ व ३ च्या कामांचे नियोजनही करून ठेवण्यास पुढे अडचण जाणार नाही, असेही गडकरी यांनी सांगितले. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयार केलेले संकेतस्थळ वेळोवेळी झालेल्या प्रगतीची माहिती जनतेला देणारच आहे. त्यासोबतच जनतेनेसुद्धा आपल्या सूचना कळविल्यास मेट्रो रेल्वे अधिक अचूकपणे काम करेल, असेही गडकरी यांनी सांगितले. पारडी उड्डाण पूल आणि प्रजापतीनगर येथील मेट्रो डेपाचे काम एकत्रितरीत्या होणार असून डिझाईन तयार झाले आहे. त्यामुळे पैशाची बचत होईल. विस्तारीकरणात कन्हान, बुटीबोरी, कामठी, डिफेन्स इथपर्यंत मेट्रो न्यावी, असे गडकरी म्हणाले. नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी वृक्षारोपण आणि बायोगॅसवर २०० बसेस चालविण्याचा मनपाचा संकल्प असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Metro Rail project of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.