‘मेट्रो-२’ला सहा हजार कोटींचा ‘बुस्टर डोस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:06+5:302021-02-05T04:44:06+5:30
मोरेश्वर मानापुुरे / योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागपूरकरांना सुखद ...

‘मेट्रो-२’ला सहा हजार कोटींचा ‘बुस्टर डोस’
मोरेश्वर मानापुुरे / योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागपूरकरांना सुखद धक्का दिला आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील ४४ किमीच्या विस्तारासाठी ५,९७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ‘मेट्रो’ प्रकल्पासाठी हा ‘बुस्टर डोस’ असून यामुळे आता आणखी विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचा डीपीआर ६,७०० कोटींचा आहे, हे विशेष.
पहिल्या टप्प्यात नागपूर मेट्रोचे ३८ किमीचे काम डिसेंबर-२०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राने निधीची तरतूद केल्याने हे काम एक महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. डीपीआर नवी दिल्लीत नागरी विकास मंत्रालयाकडे आहे. त्याला १५ दिवसांतच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आजपासूनच कामाचे नियोजन सुरू केले आहे. मेट्रोचा ३८ किमीचा (३८ स्टेशन) पहिला टप्पा मिहान, प्रजापतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि कळमना चौकापर्यंत आहे. आता ४४ किमीच्या (३२ स्टेशन) दुसऱ्या टप्प्यात मिहान ते बुटीबोरी इंडस्ट्रीज एरिया आणि हिंगणा, कन्हान आणि ट्रान्सपोर्टनगरपर्यंत राहणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पाच वर्षांत पूर्ण होणार आहे.
नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा ८७८० कोटींचा आहे. बांधकाम करताना कोट्यवधी रुपयांची महामेट्रोने बचत केली आहे. दुसरा टप्पा ६,७०० कोटींचा आहे; पण केंद्राने ५,९७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात बचत केलेला निधी दुसऱ्या टप्प्यासाठी वापरण्यात येणार आहे. जागेच्या अधिग्रहणाचा प्रश्न मेट्रोसमोर नाही. त्यामुळे दुसरा टप्पा पाच वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वानंतर प्रवासी संख्या वाढणार असल्याचेही अधिकारी म्हणाले.
देशात ७०२ किमीची ‘मेट्रो’ सेवा सुरू
देशात सद्य:स्थितीत ७०२ किलोमीटर लांबीची ‘मेट्रो’ सेवा सुरू आहे. २७ शहरांमध्ये १ हजार १६ किलोमीटरचे ‘मेट्रो’चे बांधकाम सुरू आहे. ‘टू-टीयर’ शहरांमध्ये तसेच ‘टीयर-१‘ शहरांच्या बाहेरील भागांसाठी ‘मेट्रोलाइट’ व ‘मेट्रोनिओ’ प्रणाली सुरू करण्यात येईल.
असा राहणार ‘नागपूर मेट्रो’चा विस्तार
- नागपूर मेट्रो टप्पा-१ : एकूण ३८ किमी
- पहिल्या टप्प्यात ३७ स्टेशन
- नागपूर मेट्रो टप्पा-२ : एकूण ४४ किमी
- दुसऱ्या टप्प्यात ३२ स्टेशन तयार होणार
- प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार
- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान : लांबी १३ किमी, स्टेशन : पिवळी नदी, खसारा फाटा, ऑल इंडिया रेडिओ, खैरी फाटा, लोक विहार, लेखानगर, कॅन्टोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठीनगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब, कन्हान नदी.
- मिहान ते बुटीबोरी ईएसआर : लांबी १८.७ किमी, स्टेशन : ईको पार्क स्टेशन, मेट्रो सिटी स्टेशन, अशोकवन, डोंगरगाव, मोहगाव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलनी, एमआयडीसी-केईसी, एमआयडीसी-ईएसआर.
- प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर : लांबी ५.५ किमी, स्टेशन : पारडी, कापसी खुर्द, ट्रान्सपोर्टनगर
- लोकमान्यनगर ते हिंगणा : लांबी ६.६ किमी, स्टेशन : हिंगणा माऊंट व्ह्यू, राजीवनगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगणा बस स्टेशन, हिंगणा.
देशातील इतर ‘मेट्रो’ प्रकल्पांना मिळालेली तरतूद
-‘कोची मेट्रो रेल्वे’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (११.५ कि.मी.) १९५७.०५ कोटी
-‘चेन्नई मेट्रो रेल्वे’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी (११८.९ कि.मी.) ६३,२४६ कोटी
- ‘बंगळुरू मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या ‘टू-ए’ व ‘टू-बी’ प्रकल्पासाठी (५८.१९ कि.मी.) १४,७८८ कोटी
-‘नाशिक मेट्रो’साठी २ हजार ९२ कोटी