नागपूर : गुजरातचे कच्छ, साैराष्ट्रासह विदर्भावरही सूर्यदेव भलताच काेपल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भात सूर्यकिरणांची तीव्रता अत्याधिक वाढली आहे. चार दिवसापूर्वी अकाेल्यानंतर गुरुवारी अमरावती देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. येथे तब्बल ४२.२ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जी अमरावतीकरांची हाेणारी हाेरपळ दर्शविणारी आहे.
मार्चच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकणे सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. महिन्याचा दुसराच आठवडा सुरू असताना विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे, जे पहिल्यांदाच हाेत आहे. चार दिवसांपूर्वी ४१ अंशाच्यावर गेलेले अकाेला शहर सर्वाधिक तापले हाेते व आता अमरावतीकरांवर सूर्य काेपला आहे. येथे पारा सरासरीपेक्षा ६.८ अंशाने अधिक आहे. विशेष म्हणजे गुरुवारी अकाेला शहराचे तापमानही ४२ अंशावर हाेते, जे सरासरीपेक्षा ५.३ अंशाने अधिक आहे. याशिवाय यवतमाळ येथे ४० अंशाची नाेंद झाली, जी सरासरीपेक्षा ५ अंशाने अधिक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरीचा पारासुद्धा सरासरीपेक्षा ४.८ अंशाने अधिक ४०.८ अंशावर आहे. हवामान विभागाने या चारही शहरात उष्णतेची लाट जाहीर केली आहे.इतर शहरांमध्येही ताप कमी नाही. वर्धा व चंद्रपूर ४०.२ अंश, नागपूर ३९ अंश, बुलढाणा ३९.५ अंश, तर जंगलव्याप्त असलेले गडचिराेली शहर ३९.४ अंशावर उसळले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भाच्या तापलेल्या शहरांमध्ये दाेन दिवस उष्ण लाटेचा सामना करावा लागू शकताे. पूर्व विदर्भात २४ तास हा ताप कायम राहू शकताे. १४ मार्चपासून वादळ व गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरणामुळे पारा घसरून उन्हापासून दिलासा मिळेल, असा अंदाज आहे.