व्यापारी, दुकानदार म्हणतात, आम्ही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:43+5:302021-04-07T04:07:43+5:30

नागपूर : लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी लहान व्यापारी आणि दुकानदार हतबल झालेले दिसले. पुढचे २५ दिवस विनाव्यवसायाने कसे काढायाचे, या ...

Merchants, shopkeepers say, how do we live? | व्यापारी, दुकानदार म्हणतात, आम्ही जगायचे कसे?

व्यापारी, दुकानदार म्हणतात, आम्ही जगायचे कसे?

नागपूर : लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी लहान व्यापारी आणि दुकानदार हतबल झालेले दिसले. पुढचे २५ दिवस विनाव्यवसायाने कसे काढायाचे, या काळातील पैशाची जुळवाजुळव कशी करायची, कर्जाचे हप्तेे कसे फेडायचे, याची चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

‘लोकमत’ने लॉकडाऊनमुळे चिंतेत पडलेल्या काही व्यापारी आणि दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी यावर चिंता आणि संतापही व्यक्त केला. लॉकडाऊन लावताना लहान दुकानदार, व्यापाऱ्यांचा विचार सरकारने करायला हवा, अशी अनेकांची प्रतिक्रया होती.

जरीपटका येथील कूलर व्यापारी दीपक तलवेजा म्हणाले, उन्हाळ्याचा सीझन सुरू झाल्याने उधारीवर मोठ्या प्रमाणावर माल आणून ठेवला आहे. कूलर विक्रीच्या दृष्टीने हाच महिना महत्त्वाचा आहे. मात्र या महिनाभर लॉकडाऊन राहणार असल्याने मालाची विक्री होणे शक्य नाही. त्यामुळे अंगावर असलेला कर्जाचा बोजा वाढणार आहे. सरकारने व्यापाऱ्यांच्या परिस्थितीचा विचार न करता लॉकडाऊन लादले. यामुळे अडचणी वाढणार आहेत.

मोबाईल विक्रेते मनीष मुलचंदानी म्हणाले, हे लॉकडाऊन मध्यम व्यापाऱ्यांना कंगाल बनविणारे आहे. मागील वर्षभर लॉकडाऊनचा कहर अनुभवला. अंगावर कर्ज घेऊन व्यापारी कसाबसा उभा होऊ पाहत असताना महिनाभराचे लॉकडाऊन लागले. यामुळे दुकानात काम करणाऱ्यांचे पगार, दुकानाचे भाडे कसे द्यायचे, हा प्रश्न आधी सरकारने सोडवावा व नंतर लॉकडाऊन लावावे.

मनवरलाल कपूर हे सुमारे ६५ वर्षांचे गृहस्थ जरीपटका परिसरात रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवतात. या टपरीवरच त्यांचा संसार चालतो. परिसरातील दुकानदार, बाजारात येणारे ग्राहक चहा पितात. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने आपली चहाची टपरी कशी चालेल, उदरनिर्वाह कसा होईल, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या उतारवयात चहा विक्रीचा आधार होता. लॉकडाऊनमुळे धंदा बंद पडल्यास पोटाची भूक कशी मिटवायची, असा त्यांचा प्रश्न होता.

प्रकाश देवगडे या चाळिशीतील व्यक्तीची व्यथा तर पुन्हा वेगळी आहे. फूटपाथवर ते चपला-जोड्यांची विक्री करतात. उन्हाळा असल्याने त्यांनी उधारीवर माल भरला होता. यातून चार पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर लॉकडाऊनमुळे धंदा बंद पडला आहे. घरी वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुले यांचे पोषण करायचे आहे. घराचे भाडे कसे द्यायचे, याची काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

Web Title: Merchants, shopkeepers say, how do we live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.