समाजामध्ये मानसिक आजार वाढताहेत
By Admin | Updated: August 2, 2015 03:11 IST2015-08-02T03:11:56+5:302015-08-02T03:11:56+5:30
वाढती स्पर्धा आणि तणावामुळे समाजामध्ये मानसिक आजार वाढत आहेत. अशा परिषदांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजासाठी होणे आवश्यक आहे.

समाजामध्ये मानसिक आजार वाढताहेत
नितीन गडकरी : इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या परिषदेचे उद्घाटन
नागपूर : वाढती स्पर्धा आणि तणावामुळे समाजामध्ये मानसिक आजार वाढत आहेत. अशा परिषदांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजासाठी होणे आवश्यक आहे. युवा डॉक्टरांनी अशा परिषदेमधून आपले ज्ञान ‘अपडेट’ करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
इंडियन सायकॅट्रिक सोसायटी, नागपूर शाखेच्यावतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध मानसिक रोगतज्ज्ञ व या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर भावे, इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. एन. एन. राजू, डॉ. विनय कुमार, डॉ. जी.पी. राव, डॉ. टी. राव, डॉ. राजीव पळसोदकर, डॉ. विवेक क्रिपेकर आणि डॉ. सुशील गावंडे उपस्थित होते. ‘मानसिक आजारात दिल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी नागपुरातील सायकॅट्रिक सोसायटीने राष्ट्रीयस्तरावर आयोजित केलेल्या या परिषदेचे कौतुक करून सर्वांचे स्वागत केले.
जिन्सचा आधार घेऊन औषधोपचार
डॉ. सुधीर भावे म्हणाले, मानवी शरीरात २४ हजार जिन्स असतात. फार्मेको जिनोमिक स्टडीमुळे प्रत्येक जिन्स ओळखणे शक्य झाले आहे. या जिन्सच्या आधारावर रुग्णाला कुठले औषध दिल्यास तो लवकर बरा होऊ शकतो किंवा त्याला त्याचे दुष्परिणाम होणार नाही किंवा कमी होणार याबाबतची माहिती मिळू शकते. येणाऱ्या काळात ही सोय भारतातही उपलब्ध होणार आहे. याचा सर्वात जास्त फायदा इतर रुग्णांसोबतच मनोरुग्णांनाही होणार आहे. मानसोपचारात प्रदीर्घ उपचाराची गरज असते.
त्यामुळे साहजिकच अन्य रोगांच्या तुलनेत यात औषधांच्या दुष्परिणामांची शक्यता अधिक राहते. काही दुष्परिणाम कालांतराने दिसतात. त्याची लक्षणे वेळीच कशी ओळखावीत, यावर या परिषदेत विचारमंथन होत आहे.
परिषदेत डॉ. विहांग वाहिया, डॉ. नीलेश शहा डॉ. चित्तरंजन अंद्राडे (बेंगळुरू) यांनी मार्गदर्शन केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. भावे यांच्यासह डॉ. राजेंद्र सारडा, डॉ. प्रवीर वराडकर, डॉ. अभिषेक सोमाणी, डॉ. राजीव पळसोडकर परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)