याकूबची कुटुंबीयांसोबत दर महिन्याला भेट

By Admin | Updated: July 31, 2015 02:55 IST2015-07-31T02:55:33+5:302015-07-31T02:55:33+5:30

१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी म्हणून याकूब मेमन याच्याविरुद्ध दोष सिद्ध झाला होता.

Meeting with Yakub's family every month | याकूबची कुटुंबीयांसोबत दर महिन्याला भेट

याकूबची कुटुंबीयांसोबत दर महिन्याला भेट

आठ वर्षात अनेकदा घेतल्या भेटी : हॉटेल द्वारकात असायचा मुक्काम
आनंद डेकाटे  नागपूर
१९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी म्हणून याकूब मेमन याच्याविरुद्ध दोष सिद्ध झाला होता. गेल्या २२ वर्षांपासून तो तुरुंगात असून मागील आठ वर्षांपासून तो नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. यादरम्यान त्याच्या कुटुंबीयांमध्ये भाऊ सुलेमान व उस्मान, पत्नी रेहान आणि मुलगी जुबेदा या नियमितपणे त्यांच्या भेटीला येत असत. महिन्यातून एकदा नागपूरला त्यांचा दौरा असायचाच. नागपुरात ते केवळ याकूबलाच भेटण्यासाठी येत होते. नागपुरात आले की, सीताबर्डीतील हॉटेल द्वारका येथे त्यांचा मुक्काम राहात होता. त्यामुळे या हॉटेलचे व्यवस्थापक रवी तेलमोरे यांच्याशी त्यांची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे त्यांना कधीही नागपुरात यायचे झाल्यास ते रवी यांना फोन वरच बुकिंग करून घ्यायचे. एकाचवेळी सर्वजण येत नव्हते. कधी भाऊ तर कधी पत्नी अशी आळीपाळीने भेट घेतली जात होती. सकाळी आले की भेट घेऊन सायंकाळी निघून जायचे असा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांच्या कुटुंबीयांपैकी सर्वांचा स्वभावसुद्धा सर्वसामान्यांप्रमाणेच होता. याकूबने नागपूरच्या तुरुंगात राहून आपला अभ्यासही सुरू ठेवला होता. जून महिन्यापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होते. याकूबचा ‘डेथ वॉरंट’ कुटुंबीयांना मिळाला आणि ते अस्वस्थ झाले. महिन्यातून एकदा येणारे वारंवार येऊ लागले. तेव्हापासून त्यांच्या स्वभावात विशेषत: सुलेमानच्या स्वभावात थोडा फरक पडला. ते शांत-शांत राहू लागले.
हॉटेल द्वारकातील सूत्रांनुसार गेले दोन दिवस याकूबचे कुटुंबीय झोपले नाही. द्वारका हॉटेलमध्ये सुलेमान आणि उस्मान हे दोघेच होते. बुधवारी याकूबच्या फाशीवर निर्णय व्हायचा होता. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ती चालली. हा सर्व घटनाक्रम दोन्ही भाऊ हॉटेलच्या आपल्या खोलीत टीव्हीवर पाहात होते. त्या दिवशी ते झोपले नाही. सुलेमानने भोजन करण्यासही नकार दिला होता. परंतु व्यवस्थापक रवी यांनी आग्रह केल्यावर केवळ डाळ भात घेतला. पहाटे ८ वाजताच्या सुमारास दोघेही भाऊ हॉटेलबाहेर पडले आणि तुरुंगातून याकूबचा मृतदेह घेऊन मुंबईला रवाना झाले.
स्कायलार्कमध्ये थांबले इतर नातलग
दरम्यान, मुंबईवरून याकूबसाठी ५ ते ६ आप्तेष्ट आले होते. याकूब व उस्मान हे हॉटेल द्वारका येथे थांबले होते. याशिवाय शेख जाफर, शेख इर्शाद आणि अंसारी खलीद हे नातेवाईकही नागपुरात आले होते. ते तिघे सीए रोडवरील हॉटेल स्कायलार्क येथील ५०४ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. याशिवाय काही महिला नातेवाईक जाफरनगर येथील नातलगाकडे थांबल्याचेही सांगण्यात आले.
अजब बंगल्याला दोन सुरक्षा रक्षक
पोलीस आयुक्तांनी संत्रानगरीतील प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे दोन सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ही व्यवस्था तात्पुरती असून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राज्य शासनाला आठ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका प्रलंबित आहे. मध्यवर्ती संग्रहालयात सोन्याचांदीचे अनेक मौल्यवान दागिने व पुरातन कलाकृती आहेत. असे असतानाही संग्रहालयात काहीच सुरक्षा व्यवस्था नाही. यामुळे संग्रहालयातील मौल्यवान कलाकृती धोक्यात आहेत. कधीही अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आली होती. न्यायालयाने अजब बंगल्याच्या दूरवस्थेची स्वत:च दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण न्यायालय मित्र आहेत.

Web Title: Meeting with Yakub's family every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.