सदस्यांच्या निरुत्साहामुळे बैठक स्थगित
By Admin | Updated: March 21, 2015 02:34 IST2015-03-21T02:34:59+5:302015-03-21T02:34:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली होती.

सदस्यांच्या निरुत्साहामुळे बैठक स्थगित
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक शुक्रवारी बोलाविण्यात आली होती. परंतु आवश्यक सदस्यसंख्या नसल्यामुळे ही बैठक स्थगित करण्याची वेळ प्रशासनावर आली. या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर असलेल्या वादग्रस्त मुद्यांवर काही निर्णय झाल्यास पुढे अडचणीत येऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन बहुतांश सदस्यांनी दांडी मारली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२६ मार्च रोजी विद्यापीठाच्या विधीसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरूपदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीच्या खर्चावरून ही बैठक गाजणार आहे, अशी चिन्हे आहेत. या खर्चाला मंजुरी देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मंजुरी आवश्यक असल्याने कार्यक्रमपत्रिकेत या मुद्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु व्यवस्थापन परिषदेत एखादा निर्णय झाला तर विधीसभेत आक्रमक भूमिका घेता येणार नाही या विचारातून बहुतांश सदस्यांनी शुक्रवारी झालेल्या विधीसभेच्या बैठकीला दांडी मारली.
नियमांप्रमाणे कमीतकमी सात सदस्य ही बैठक घेण्यासाठी आवश्यक असतात. परंतु अखेरपर्यंत सहा सदस्यच उपस्थित होते. त्यामुळे नाईलाजाने प्रशासनाला बैठक स्थगित करावी लागली. दरम्यान, बैठक स्थगित झाल्यानंतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड.अभिजित वंजारी विद्यापीठात पोहोचले.(प्रतिनिधी)