भाजप आमदार घेणार सरसंघचालकांची भेट
By Admin | Updated: December 4, 2015 02:57 IST2015-12-04T02:57:47+5:302015-12-04T02:57:47+5:30
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे राज्यातील काही आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार घेणार सरसंघचालकांची भेट
अधिवेशन काळात वेळ घेण्याचा प्रयत्न सुरू : मार्गदर्शन घेण्याचा मानस
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे राज्यातील काही आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. डॉ. भागवत यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी या आमदारांची इच्छा असून त्यांचा वेळ मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ही भेट होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार तीन आठवडे नागपुरात राहणार आहेत. यावेळी अनेक आमदार रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. मागील वर्षी अधिवेशनाअगोदरच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसमवेत अनेक आमदारांनी येथे भेट दिली होती. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात आले होते. परंतु यावेळी सरसंघचालकांसोबत आमदारांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे संघभूमीत परत येत असताना सरसंघचालकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी भाजपच्या काही आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत डॉ. भागवत हे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या ४ दिवसांत तर त्यांची भेट होण्याची शक्यता नाही. परंतु १० तारखेनंतर ते नागपुरात येण्याची दाट शक्यता असून अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांची वेळ मिळते का याची आमदारांकडून चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारणादेखील झाली आहे. परंतु अद्याप भेटीसंदर्भात निश्चिती झालेली नाही, अशी माहिती एका भाजपाच्या आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. जर सरसंघचालक नागपुरात असले आणि ते व्यस्त नसले तर निश्चितच ते आमदारांना भेटतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)