मेडिकलची रुग्णसेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:58 IST2017-10-10T00:57:30+5:302017-10-10T00:58:48+5:30
मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा (मास लीव्ह) सोमवार हा तिसरा दिवस असतानाही तोडगा निघाला नाही.

मेडिकलची रुग्णसेवा कोलमडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा (मास लीव्ह) सोमवार हा तिसरा दिवस असतानाही तोडगा निघाला नाही. यातच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने बाह्यरुग्ण विभाग रुग्णाने फुल्ल होता, परंतु मोजकेच डॉक्टर असल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास वाट पहावी लागली. शस्त्रक्रियेचा आकडाही आता निम्म्यावर आल्याने मेडिकलची रुग्णव्यवस्था कोलमडली आहे.
विशेष म्हणजे, सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी सोमवारी मेडिकलच्या निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. परंतु त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) सुरक्षा रक्षक १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने रुग्णालयाची सुरक्षा वाºयावर पडली. २५ दिवस होऊनही मेडिकल प्रशासन डॉक्टरांच्या सुरक्षेकडे
लक्ष देत नसल्याचे पाहत शुक्रवारी रात्री ९ वाजतापासून मेडिकलचे १५० निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले. सोमवारपर्यंत स्थिती बदलून डॉक्टर कामावर परततील अशी अपेक्षा होती. परंतु डॉक्टर तिसºया दिवशीही आपल्या मागण्यांना घेऊन कायम असल्याने हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे.
१९ रुग्णांचा मृत्यू
रविवारी सकाळी ८ वाजेपासून ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूला घेऊनही डॉक्टरांच्या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. तातडीच्या तपासण्या, रोगाचे निदान व उपचारात होत असलेल्या उशिरामुळे रुग्णांच्या जीवावर तर बेतत नाही ना, याकडेही शंकेने पाहिले जात आहे.
रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवा
सहायक संचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी आज निवासी डॉक्टरांसोबत चर्चा करून सामूहिक रजेचे आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. त्यांनी लवकरात लवकर सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले. मात्र, हे आश्वासन ‘मार्ड’च्या लेटरहेडवर लिहून देण्याची अट डॉक्टरांनी घातल्याने चर्चा फिस्कटल्याची माहिती आहे. रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवा अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही डॉ. वाकोडे यांनी डॉक्टरांना दिल्याचे समजते.
आम्हाला हे सुरक्षा रक्षक नको
आमचा सुरुवातीपासून ‘युनिटी’ कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना विरोध होता. आम्हाला ज्यांच्याकडून योग्य पद्धतीने सुरक्षा होईल असे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक हवेत. मंगळवारी या मुद्याला घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालक यांच्याशी मुंबई येथे बैठक आहे. या बैठकीत आमच्या सुरक्षेच्या मागण्या पूर्ण होतील, हा विश्वास आहे.
-डॉ. प्रदीप कासवान, अध्यक्ष, मार्ड मेडिकल
५० टक्के शस्त्रक्रियांना बसला फटका
मेडिकलमध्ये सोमवारी गंभीर शस्त्रक्रिया १७ तर किरकोळ शस्त्रक्रिया १८ झाल्या आहेत. सूत्रानुसार, इतर दिवशी याच्या दुप्पट संख्येत या दोन्ही शस्त्रक्रिया व्हायच्या. निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे ५० टक्के शस्त्रक्रियांना फटका बसला आहे. अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचेही समजते.
डॉक्टर २०, रुग्ण तीन हजारावर
निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने मेडिकलच्या वैद्यकीय अधिकाºयांपासून ते सर्व वरिष्ठ डॉक्टरांची तीन पाळीत ड्युटी लावण्यात आली. त्यानुसार सोमवारी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) साधारण २० डॉक्टर आपली सेवा देत होते. परंतु आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने तीन हजारावर रुग्ण उपचारासाठी आले. परिणामी, व्यवस्थाच कोलमडली. प्रत्येक विभागासमोर रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन), शल्यचिकित्सा, अस्थिरोग व स्त्री रोग व प्रसूती विभागात रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. तासन्तास प्रतीक्षेनंतर रुग्णांना उपचार मिळाल्याची माहिती आहे.
रात्रीपासून ६८ सुरक्षा रक्षक तैनात
मेडिकलच्या सुरक्षेची जबाबदारी ‘युनिटी’ या सुरक्षा कंपनीवर देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. या कंपनीचे ६८ सुरक्षा रक्षक आपली सेवा देतील, सोबतच १० बंदुकधारी रक्षकांचाही समावेश असेल. रात्री ९ वाजेपासून यांची ड्युटी लावण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा विषय आता निकाली निघाला आहे, यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल