मेडिकल : आणिखी एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:56 IST2020-08-14T23:55:07+5:302020-08-14T23:56:39+5:30
‘प्रोजेक्ट प्लॅटिना’च्या (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) माध्यमातून मेडिकलमध्ये आणखी एका रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्माचा दुसरा डोज चढविण्यात आला. कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे.

मेडिकल : आणिखी एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’च्या (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) माध्यमातून मेडिकलमध्ये आणखी एका रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्माचा दुसरा डोज चढविण्यात आला. कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या ४७२ रुग्णांवर राज्यभरात चाचणी केली जाणार आहे. याची सुरुवात मागील महिन्यात झाली. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांवर पहिल्यांदाच चाचणी होत आहे. परंतु कठोर नियमांमुळे चाचणीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यास वेळ लागणार आहे. शुक्रवारी प्लाझ्मा देण्यात आलेला रुग्ण हा मध्यम लक्षणांकडून गंभीर लक्षणांकडे जात होता. चाचणीत तो बसत असल्याने २०० मिली प्लाझ्माचे एक दिवसाच्या अंतराने दोन डोज देण्यात आले. या रुग्णाच्या प्रकृतीवर डॉक्टरांच्या चमूचे लक्ष आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’चे प्रभारी व स्टेट नोडल अधिकारी डॉ. मो. फैजल, या प्रकल्पातील चाचणीचे प्रमुख अन्वेषक आणि संयोजक डॉ. सुशांत मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, रक्तपेढी प्रमुख डॉ. संजय पराते आदींच्या देखरेखीखाली ही चाचणी केली जात आहे.