मेडिकलमध्ये स्पीचथेरपिस्ट आॅडिओलॉजिस्ट पदच नाही
By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:59:18+5:302015-02-03T00:59:18+5:30
तोतरेपणा , उच्चार स्पष्ट नसणं , बोलताना सतत अडखळणं अशा समस्या अनेकांमध्ये आढळून येतात. या समस्या असलेल्या व्यक्तींवर स्पीचथेरपिस्ट उपचार करतात.

मेडिकलमध्ये स्पीचथेरपिस्ट आॅडिओलॉजिस्ट पदच नाही
रुग्ण अडचणीत : वैद्यकीय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
नागपूर : तोतरेपणा , उच्चार स्पष्ट नसणं , बोलताना सतत अडखळणं अशा समस्या अनेकांमध्ये आढळून येतात. या समस्या असलेल्या व्यक्तींवर स्पीचथेरपिस्ट उपचार करतात. तर आॅडिओलॉजिस्ट हे लहान मुलांच्या तसेच मोठ्यांच्याही बहिरेपणावर उपचार करतात. रु ग्णांमध्ये श्रवण क्षमता किती कमी आहे , यानुसार नंतर उपचार केला जातो. मात्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये हे दोन्ही पदेच नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील १४ मेडिकल रुग्णालयापैकी १२ रुग्णालयात ही पदेच निर्माण करण्यात आलेली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
मानवी जीवनात शब्दांचं, भाषेचं, संवादाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. एका व्यक्तीच्या मनात निर्माण झालेला विचार शब्दांद्वारे व्यक्त होतो. संबंधित दुसऱ्या व्यक्तीच्या श्रवणेंद्रियांद्वारे या शब्दांचा स्वीकार होत मेंदूद्वारे त्याच्या अर्थाचा बोध होतो. वाचताना सहजसोपी वाटणारी ही प्रक्रि या काही व्यक्तींसाठी मात्र विविध कारणांमुळे अतिशय अवघड बनलेली असते. उदा. ऐकू न येणं, बोलता न येणं, बोलताना वारंवार अडखळणे, अशा अनेक अडचणी असू शकतात. मात्र, या अडचणींवर मात करण्यासाठी आॅडिओलॉजिस्ट व स्पीच थेरिपस्ट यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. विशेष म्हणजे, दुर्दैवाने जन्मत:च तोतरेपणा व बहिरेपणाचे अपंगत्व घेऊन येणाऱ्या बाळांचे प्रमाण अधिक आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि व्याधीग्रस्त लोकांच्या प्रमाणात मेडिकलमध्ये या दोन्ही पदांची नितांत गरज असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग या पदाला बगल देत आहे.
मेडिकलच्या ईएनटी विभागातील डॉक्टर आपल्यापरीने या दोन्ही पदांची जबाबदारी सांभाळतात, परंतु किती टक्के बहिरा किंवा तोतडेपण आहे, याच्या टक्केवारीचे अधिकार त्यांना नाही. या संबंधीचे प्रमाणपत्रही त्याना देता येत नाही. टक्केवारीसाठी किंवा प्रमाणपत्रासाठी अशा रुग्णांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ईएनटी विभागात पाठविले जाते. अनेक रुग्णांना याची माहिती नसल्याने ते आपला संताप येथील डॉक्टरांवर काढतात. विशेष म्हणजे मेडिकलच्या ईएनटी विभागात अशा रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष व यंत्र उपलब्ध आहे. परंतु स्पीच थेरपिस्ट व आॅडिओलॉजिस्ट हे तज्ज्ञ नसल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. (प्रतिनिधी)
एमसीआयच्या मानकालाही बगल
महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) मानकानुसार स्पीचथेरपिस्ट व आॅडिओलॉजिस्ट ही दोन्ही पदे रुग्णालयात असणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये दरवर्षी तपासणीसाठी येणारी एमसीआयची चमू आपल्या अहवालातही ही दोन्ही पदे नसल्याची त्रुटी काढते.
उपचार करणे कठीण
मेडिकलच्या ईएनटी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २०० रुग्ण येतात. यातील २० च्यावर रुग्णांना स्पीचथेरपिस्ट किंवा आॅडिओलॉजिस्टची गरज भासते. परंतु हे पदच नसल्याने विशेषत: मुलांचे तोतरेपणा, उच्चार स्पष्ट नसणे, बोलताना सतत अडखळण्याची समस्या दूर करणे किंवा बहिरेपणावर उपचार करणे कठीण होत असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.