मेडिकलमध्ये ‘मुन्नाभाई’

By Admin | Updated: July 4, 2015 03:02 IST2015-07-04T03:02:32+5:302015-07-04T03:02:32+5:30

राहुल (२५) मूळ रा. मूल, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असे पकडलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

Medical 'Munnabhai' | मेडिकलमध्ये ‘मुन्नाभाई’

मेडिकलमध्ये ‘मुन्नाभाई’

स्त्री रोग विभागाच्या वॉर्डात आढळला बोगस डॉक्टर : पाठलाग करून पकडले
राहुल (२५) मूळ रा. मूल, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असे पकडलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. मेडिकलमध्ये गुरुवारपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. ४०० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाल्यामुळे मेडिकल कॉलेजच्या २०० इंटर्नवर रुग्णसेवेची जबाबदारी सोपविण्यात आली. होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ‘बीपीएमटी’ या पॅरामेडिकलचा विद्यार्थी असलेला राहुल हा बोगस डॉक्टर बनून स्त्री रोग विभागाच्या वॉर्ड क्र.२२ मध्ये शिरला. तिथून तो वॉर्डाच्या वऱ्हांड्यात आला. त्याचेवेळी मेडिकलचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रमेश पराते व इतर डॉक्टर त्या भागातून जात असताना त्यांना या बोगस डॉक्टराचा संशय आला. त्यांनी राहुलला जवळ बोलवून विचारणा केली. राहुलच्या गळ्यात ओळखपत्रही होते. डॉ. पराते यांनी अधिक चौकशी केली असता राहुल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय अधिक बळावताच डॉ. पराते यांनी अधीक्षक कक्षाकडे चलण्यास सांगितले. त्याचवेळी राहुल पळायला लागला.
डॉक्टरांनी आरडाओरड केली. सुरक्षारक्षकांनी त्याचा पाठलाग केला असता नागरिकांनी राहुलला पकडले आणि मेडिकल प्रशासनाच्या स्वाधीन केले.
बोगस डॉक्टर पकडल्याची वार्ता मेडिकलमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने लागलीच अजनी पोलिसांना बोलावून बोगस डॉक्टर राहुलला पोलिसांच्या स्वाधीन केले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत मेडिकल प्रशासनाकडून या बोगस डॉक्टराच्या विरोधात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नव्हती.(प्रतिनिधी)

इंटर्न मित्राच्या मदतीसाठी बनला ‘डॉक्टर’!
पकडलेल्या राहुलची विचारपूस केली असता त्याने मेडिकलमध्ये इंटर्नचा विद्यार्थी असलेला युवराज या विद्यार्थ्याचा मित्र असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, संपामुळे गुरुवारपासून युवराजची ड्युटी वॉर्डात लावण्यात आली होती. शुक्रवारी काही तास आराम करावा यासाठी त्याने राहुलला अ‍ॅप्रॉन घालून वॉर्डात जाण्यास सांगितले आणि हे प्रकरण घडले. युवराजचे इतर इंटर्न मित्र युवराजची ही पहिलीच चूक असल्याचे सांगून त्याला सोडण्याची विनंती करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत अधिष्ठाता कार्यालयासमोर ठाण मांडून होते.

Web Title: Medical 'Munnabhai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.