मेडिकल, मेयोचे डॉक्टर संपावर
By Admin | Updated: April 8, 2016 02:43 IST2016-04-08T02:43:04+5:302016-04-08T02:43:04+5:30
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर रविवारपासून संपावर आहेत.

मेडिकल, मेयोचे डॉक्टर संपावर
नागपूर : जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर रविवारपासून संपावर आहेत. आता मेडिकल व मेयोच्या निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात उडी घेत शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून ‘मास बंक’वर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या नेत्र रोग विभागाच्या प्रमुख शस्त्रक्रिया करू देत नाहीत, सतत अपमान करतात, असा या विद्यार्थ्यांचा दावा असून दुसरीकडे रुग्णांवर उपचार करताना हेळसांड केल्याने चौकशी सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्याला लक्ष्य केल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांकडे या प्रकरणी दाद मागितली असून दोन्ही डॉक्टरांना तत्काळ हटविण्याच्या मागणीसाठी रविवारपासून आंदोलनाची हाक दिली आहे. ‘सेंट्रल मार्ड’ने मंगळवारी यात सहभागी होऊन आम्ही त्यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.
गुरुवारी सायंकाळी मेडिकल व मेयोच्या ‘मार्ड’ने शुक्रवारी सकाळ पासून ‘मास बंक’वर जात असल्याचे पत्र दोन्ही अधिष्ठात्यांना दिले. मेडिकलमधील जवळपास ४५० तर मेयोतील जवळपास २०४ निवासी डॉक्टर असे एकूण ६५४ डॉक्टर संपावर जाणार आहेत. केवळ अपघात विभागात निवासी डॉक्टर आपली सेवा देतील. सोमवारीपर्यंत संप मिटेल, असा विश्वास मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)