विभागीय आयुक्तांकडून मेडिकलची पाहणी
By Admin | Updated: February 18, 2015 02:35 IST2015-02-18T02:35:46+5:302015-02-18T02:35:46+5:30
मेडिकलमधील अस्वच्छता, गर्दी, सुरक्षा व इतर विषयांच्या याचिकेवर न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त ...

विभागीय आयुक्तांकडून मेडिकलची पाहणी
नागपूर : मेडिकलमधील अस्वच्छता, गर्दी, सुरक्षा व इतर विषयांच्या याचिकेवर न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी शनिवारी मेडिकलमध्ये जाऊन पाहणी केली. विविध वॉर्ड, विभागांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले.
डिसेंबर २०१४ रोजी, सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मेडिकलमध्ये अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, नातेवाईकांची प्रचंड गर्दी, सुरक्षेचा अभाव, डॉक्टरांची मनमानी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष आदी विषयांचा समावेश होता.
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या कार्यकाळात ही याचिका दाखल झाली होती. त्यानंतर अधिष्ठातापदी रुजू झाल्यानंतर डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्वच्छतेचा विषय हाती घेऊन संपूर्ण रुग्णालय व महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आता रुग्णालयात स्वच्छता नजरेस पडते. याशिवाय पासेसद्वारे गर्दी कमी करण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांचा नियमित वावर, औषधांचा तुटवडा दूर करणे आदींसह अनेक कामांना प्राधान्य देऊन मेडिकलची अव्यवस्था रुळावर आणली. पण, जुन्या याचिकेचा न्यायालयात नुकताच निकाल लागला. मेडिकलमध्ये काय व्यवस्था आहे याची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना दिले. त्यानुसार ते मेडिकलमध्ये धडकले. परंतु मेडिकलचे बदललेले चित्र पाहून समाधान व्यक्त केले.
त्यांनी बाह्यरुग्ण विभागापासून ते स्वाईन फ्लू वॉर्डाची माहिती घेतली. वॉर्डांना भेटी दिल्या. डॉक्टर व विद्यार्थ्यांविषयी माहिती घेऊन आढावा घेतला. याशिवाय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासोबत स्वत: आयुक्तांनी झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ केला. सर्वत्र स्वच्छता आढळून आल्याने अनुप कुमार यांनी भेटीअंती एकूणच व्यवस्थेवर मेडिकल प्रशासनाचे कौतुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, विभाग प्रमुख डॉ. अरुण हुमणे, डॉ. अशोक मदान, डॉ. बोकडे, डॉ. एम.जी. मुद्देश्वर, डॉ. सजल मित्रा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)