मेडिकल हाऊसफुल्ल
By Admin | Updated: April 29, 2016 02:49 IST2016-04-29T02:49:25+5:302016-04-29T02:49:25+5:30
वाढत्या तापमानाच्या आजारासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

मेडिकल हाऊसफुल्ल
एप्रिल हिटचा फटका : बालरोग, स्त्रीरोग व अस्थिरोग विभागात रुग्णांची गर्दी
नागपूर : वाढत्या तापमानाच्या आजारासोबतच इतरही आजारांच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अनेक विभागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटाच शिल्लक नाहीत. एका खाटेवर दोन तर कुठे जमिनीवर गादी टाकून रुग्ण उपचार घेत आहे. सध्याच्या स्थितीत बालरोग, स्त्रीरोग व प्रसुती, अस्थिरोग व प्लास्टिक सर्जरी विभागात खाटांच्या संख्येत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. विशेष म्हणजे, स्त्रीरोग व प्रसुती विभागातील १९५ खाटांच्या दुप्पट ३९३ रुग्ण उपचार घेत आहेत. परिणामी, निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण पडला आहे.
शहराचे तापमान ४३-४५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. प्रचंड उकाड्याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या शिवाय वाढत्या अपघातासोबतच डागा व मनपाच्या रुग्णालयात सोयींच्या अभावाने मेडिकलकडे रुग्णांचा ओघ वाढला आहे. इतर दिवसांमध्ये मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात साधारण १६०० वर रुग्ण येतात. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या १९०० वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बालरोग वॉर्डातील खाटांची संख्या १०० असताना उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ११५ वर गेली आहे. गर्दीचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या अस्थिरोग वॉर्डात ८० खाटा आहेत. याच्या तुलनेत रुग्णांची संख्या १२२ वर पोहचली आहे. स्त्रीरोग वॉर्डात खाटांची संख्या १९५ असताना रुग्णांची संख्या ३९३ वर गेली आहे. येथील अनेक गर्भवती प्रसुतीच्या वेदना सहन करीत जमिनीवर उपचार घेत आहेत. प्लास्टिक सर्जरीमध्ये खाटांची संख्या ४२ असताना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५० आहे.