मेडिकलचा बिघडला 'रक्तदाब' : बहुसंख्य बीपी अ‍ॅपरेट्स नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:12 IST2019-11-22T23:11:06+5:302019-11-22T23:12:00+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अ‍ॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत.

Medical deteriorated 'blood pressure': majority of BP apparatus unaffected | मेडिकलचा बिघडला 'रक्तदाब' : बहुसंख्य बीपी अ‍ॅपरेट्स नादुरुस्त

मेडिकलचा बिघडला 'रक्तदाब' : बहुसंख्य बीपी अ‍ॅपरेट्स नादुरुस्त

ठळक मुद्दे मेडिसीन विभागात ५०० रुग्णांकरिता एकच यंत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. सूत्रानुसार, रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अ‍ॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत. विशेष म्हणजे, या यंत्राच्या दुरुस्तीला रोक लावण्यात आली आहे, तर नवे यंत्र कधी मिळणार याची कुणालाच शाश्वती नाही. परिणामी, सर्वाधिक रुग्ण असलेल्या ‘मेडिसीन’च्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) ५०० वर रुग्णांचे ‘बीपी’ एकाच यंत्रावर मोजले जात आहे.
मेडिकलमध्ये केवळ विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या राज्यातूनही रुग्ण येतात. सर्वाधिक रुग्ण औषधवैद्यकशास्त्र म्हणजे ‘मेडिसीन’ विभागात असतात. सूत्रानुसार, ओपीडी विभागात स्वत:चे रोज ५०० वर रुग्ण येतात तर इतर विभागातून तपासणीसाठी ३००वर रुग्णांना पाठविले जाते. साधारण ८००वर रुग्णांची तपासणी होते. सकाळी ८.३० वाजेपासून लागलेली रांग ९ वाजताच ओपीडी कक्षाबाहेर जाते. सर्वाधिक गर्दी याच विभागात राहत असतानाही येथील सोई व आवश्यक यंत्रसामुग्रीकडे मेडिकल प्रशासनाचे फारसे लक्ष नसल्याचे चित्र आहे.
गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या ‘फिटनेस’साठी एक रुग्ण मेडिसीनच्या ओपीडीत आला. त्याला केवळ रक्तदाब मोजण्यासाठी इतर रुग्णांच्या रांगेत लागावे लागले. एक तासानंतर त्याचा नंबर लागला. डॉक्टरांनी त्याच्याजवळचे कागदपत्र पाहत ‘बीपी’ तपासण्यासाठी पुन्हा बसण्यास सांगितले. ‘ओपीडी’त बीपी मोजण्याचे एकच यंत्र होते. एक कनिष्ठ डॉक्टर एक-एक रुग्णांचे ‘बीपी’घेत असल्याने पुन्हा अर्धा तास वाट पहाण्याची वेळ त्या रुग्णावर आली. यातही घाईघाईत चुकीचा रक्तदाब मोजला गेला. वरिष्ठ डॉक्टराला याचा संशय आल्याने त्यांनी पुन्हा रक्तदाब मोजला. असे प्रकार येथे रोज होत असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

Web Title: Medical deteriorated 'blood pressure': majority of BP apparatus unaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.