मेडिकलमध्ये बदल होऊ शकतो, मेयोत का नाही ?
By Admin | Updated: February 23, 2015 02:44 IST2015-02-23T02:44:35+5:302015-02-23T02:44:35+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात गेल्या तीन महिन्यांमध्ये सुसूत्रता आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली.

मेडिकलमध्ये बदल होऊ शकतो, मेयोत का नाही ?
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात गेल्या तीन महिन्यांमध्ये सुसूत्रता आली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या वाढली. विशेषत: स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. मेडिकलमध्ये हा बदल होऊ शकतो, तर मेयोमध्ये का नाही, असा सवाल महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांना विचारून कोंडीत पकडले. आज रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मुख्य सचिव क्षत्रिय यांनी नागपुरातील निवासस्थानी शासकीय रुग्णालयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला क्षत्रिय यांनी मेडिकलच्या विविध विषयांवर चर्चा केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी मेडिकलची पाहणी करून डॉ. निसवाडे यांच्या कामाची प्रशंसा केली होती. आजच्या बैठकीतही क्षत्रिय यांनी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले. मात्र, मेयो रुग्णालयातील अस्वच्छता, सुरक्षा, औषधांचा तुडवडा यावर, क्षत्रिय यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलण्याची कडक सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय या बैठकीत क्षत्रिय यांनी स्वाईन फ्लू, वाहतुकीची कोंडी, मेडिकलच्या जमिनीचा प्रश्न, न्यायालयातील याचिका आदी बाबींचाही आढावा घेतला. (प्रतिनिधी)