‘मेकॅनिकल’ शाखाच ठरतेय ‘किंग’
By Admin | Updated: July 14, 2015 02:53 IST2015-07-14T02:53:28+5:302015-07-14T02:53:28+5:30
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या सुरुवातीच्या दोन फेऱ्या संपल्या असून, आता ही प्रक्रियाा जवळपास अखेरच्या टप्प्याकडे

‘मेकॅनिकल’ शाखाच ठरतेय ‘किंग’
नागपूर : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या सुरुवातीच्या दोन फेऱ्या संपल्या असून, आता ही प्रक्रियाा जवळपास अखेरच्या टप्प्याकडे पोहोचत आली आहे. नामांकित महाविद्यालयांची एकूण ‘कट आॅफ’ यादी पाहता यंदा विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त ओढा ‘मेकॅनिकल’ शाखेकडेच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांत ‘कोअर’ शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
यंदा राज्यभरात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान असते ते शाखा निवडण्याचे. नेमकी कुठली शाखा निवडावी, याचा अनेकांना अखेरपर्यंत निर्णयच घेता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शिवाय काही ठराविक शाखांनाच जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी तर ‘कोअर’ शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु आता परिस्थिती परत बदलताना दिसून येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यार्थ्यांचा कल ‘मेकॅनिकल’ शाखेकडेच जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भात ‘मेकॅनिकल’खालोखाल ‘कॉम्प्युटर सायन्स’ व ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन’ या शाखांना विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले. परंतु पुणे परिसरात या तिन्ही शाखांना जवळपास सारखे प्राधान्य देण्यात येत आहे. ‘कट आॅफ’वर नजर टाकली तर सर्वात कमी मागणी ही ‘प्रॉडक्शन’ व ‘मेटलर्जी’ शाखांना आहे. ‘आयटी’ क्षेत्राची भरभराट होत असताना विद्यार्थ्यांचा कल ‘आयटी’ शाखेपेक्षा ‘कॉम्प्युटर सायन्स’कडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.
‘कोअर’ शाखांचे
‘अच्छे दिन’
‘आयटी बूम’ आली असताना विद्यार्थ्यांचा ‘कोअर’ शाखांकडे ओढा कमी झाला होता. परंतु आता परत या शाखांची मागणी वाढली आहे. विशेषत: ‘मेकॅनिकल’सोबतच ‘इलेक्ट्रीकल’, ‘सिव्हिल’ला विद्यार्थ्यांची पसंती आहे. ‘कोअर’ शाखा घेणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रासोबतच ‘आयटी’मध्येदेखील ‘प्लेसमेंट’ची संधी असते. शिवाय जागतिक पातळीवर ‘रोबोटिक्स’ तसेच इतर तंत्रज्ञानात ‘कोअर’ शाखेला मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थी याला जास्त प्राधान्य देतात, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे नागपूर विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
भविष्यात मोठ्या संधी
‘मेकॅनिकल’पेक्षा ‘कॉम्प्युटर सायन्स’ व ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन’ या शाखांमध्ये रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध होत आहेत. ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या आकडेवारीकडे लक्ष टाकले तर ‘आयटी’ क्षेत्रातच जास्त मागणी आहे, हे सहज लक्षात येईल. जागतिकीकरण व भारतीय सरकारचे विविध उपक्रम लक्षात घेता, या शाखांमध्ये प्रचंड संधी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील संधी पाहून शाखांची निवड केली आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.
संगणकात ‘अप्लाईड’पेक्षा ‘कोअर’ला प्राधान्य
‘कॉम्प्युटर सायन्स’ व ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या दोन्ही शाखा संगणकाशीच संबंधित आहेत. परंतु तरीदेखील ‘कॉम्प्युटर सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. ही शाखा काहीशी ‘कोअर’ या गटात मोडते. तर ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ ही शाखा ‘अप्लिकेशन ओरिएन्टेड’ आहे. विद्यार्थी ‘अप्लाईड’पेक्षा ‘कोअर’ला जास्त प्राधान्य देताना दिसतात. ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये दोन्ही शाखांना समान संधी असते, अशी माहिती रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे यांनी दिली. या दोन्ही शाखांमधील काहीसा अभ्यासक्रम सारखाच असतो. संगणकाशी संंबंधित विषय असल्याने प्रवेश घेणाऱ्यांसाठी दोन शाखा उपलब्ध असतात. त्यामुळे एक शाखा लवकर भरते व दुसऱ्या शाखेत जागा रिक्त असल्याचे दिसून येते. याचा अर्थ या शाखांची ‘क्रेझ’ कमी झाली आहे असा काढता येणार नाही, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले. (प्रतिनिधी)