खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक

By योगेश पांडे | Published: January 15, 2024 09:05 PM2024-01-15T21:05:32+5:302024-01-15T21:05:48+5:30

नागपुरातील कोळसा व्यापाऱ्यांसह अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज

MD and accountant in private company became a thug | खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक

खाजगी कंपनीतील एमडी व अकाऊन्टंट झाले ठकबाज, तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक

योगेश पांडे/  नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंतवणूकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका कोळसा व्यापाऱ्यासह तिघांची १.९३ कोटींनी फसवणूक करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्यांपैकी एक आरोपी खाजगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असून दुसरा आरोपी त्याच कंपनीत अकाऊन्टंट आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राजेशकुमार गया सिंग (३८, फ्रेंड्स कॉलनी) असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे. ते कोल ट्रेडिंग व मायनिंगचा व्यवसाय करतात तसेच अभिनव ट्रेडिंग ही कंपनी चालवतात. बी.एस.ईसपॅट लिमीटेड या कंपनीशी त्यांनी मिल माईन्ससंदर्भात व्यवहार केला होता व तेव्हा त्यांची ओळख तेथील व्यवस्थापकीय संचालक भवानीप्रसाद मिश्रा याच्याशी झाली होती. २०२२ मध्ये मिश्रा व त्या कंपनीतील अकाऊन्टंट सागर कासनगोट्टुवार यांनी सिंग यांना धंतोलीतील चिंतामणी अपार्टमेंट्समधील कार्यालयात भेटायला बोलविले. जर तुम्ही व तुमच्या परिचयातील लोकांनी आमच्या कंपनीत पैसे गुंतविले तर वर्षभरात दुप्पट करून देतो अशी बतावणी केली. दोघांवर विश्वास ठेवून सिंग हे त्यांचे परिचित ब्रिजेश अग्रवाल व मेधा किशोर अग्रवाल यांना घेऊन दोघांना भेटले.

८ एप्रिल २०२२ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत सिंग यांनी स्वत: १.३४ कोटी रुपये मिश्राच्या खात्यात वळते केले. मिश्राने नफ्याच्या नावाखाली त्यातील ४७ लाख परत केले. मात्र उर्वरित ८७ .३५ लाख दिलेच नाही. मेधा अग्रवाल यांनी ५८ लाख तर ब्रिजेश अग्रवाल यांनी ५० लाख गुंतविले होते. मात्र आरोपींनी त्यातील एकही पैसा परत केला नाही. सिंग व इतर दोघांचे मिळून आरोपींनी १.९३ कोटी रुपये गंडविले. तक्रारदारांनी वारंवार त्यांना पैसे परत देण्याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी टाळाटाळ करत होते. अखेर सिंग यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज
या दोन्ही आरोपींनी शहरातील आणखी काही व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. अधिक तपासातून पुढील तथ्य समोर येतील.

Web Title: MD and accountant in private company became a thug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.