एमसीआय राज्य सदस्य निवडणूक निकालाच्या अधिसूचनेस मनाई
By Admin | Updated: June 20, 2015 03:06 IST2015-06-20T03:06:23+5:302015-06-20T03:06:23+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)वर प्रत्येक राज्यातून एक सदस्य निवडून पाठविला जातो.

एमसीआय राज्य सदस्य निवडणूक निकालाच्या अधिसूचनेस मनाई
हायकोर्ट : अशोक अढाव यांची रिट याचिका
नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)वर प्रत्येक राज्यातून एक सदस्य निवडून पाठविला जातो. महाराष्ट्रासाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई येथील कॉलेज आॅफ फिजिशियन्स अॅन्ड सर्जन्सचे संचालक डॉ. गिरीश मैंदरकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाची अधिसूचना काढण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तात्पुरती मनाई केली.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा करून केंद्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांसमक्ष निवडणूक याचिका सादर केली आहे. या याचिकेची गेल्या तीन महिन्यांपासून दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे अढाव यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. प्रलंबित निवडणूक याचिका तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी त्यांची विनंती आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर वरीलप्रमाणे मनाईहुकूम दिला. तसेच, केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण विभागाचे सचिव, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण सिंगारे, डॉ. गिरीश मैंदरकर, एमसीआय सचिव व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
एमसीआय राज्य सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. निवडणूक पोस्टल बॅलेटद्वारे होते. राज्यात ७८ हजारावर मतदार आहेत. निवडणुकीत अढाव यांना सुरुवातीपासूनच अडचणीत आणण्याचे प्रयत्न झालेत.
अनुमोदक व सूचक यांच्या नावाखाली त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करण्यात आला नाही असे कारण नमूद करून अढाव यांचे नामनिर्देशनपत्र रद्द करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना निवडणूक लढवता आली. निवडणुकीत मैंदरकर यांना १२ हजार तर, अढाव यांना ९३०० मते मिळाली आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. आनंद परचुरे व अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.(प्र्रतिनिधी)